जळगाव जि.प.तील अनुंकपाच्या भरतीला पुन्हा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:17 PM2018-09-12T12:17:22+5:302018-09-12T12:18:13+5:30
दोन महिन्यानंतर सीईओंनी नोंदविला अभिप्राय
जळगाव : गेल्या तीन वर्षात अनुकंपा भरतीच्या फाईलची अधिकाऱ्यांनी टोलवा टोलवी केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी या प्रस्तावावर आक्षेप घेतल्याने हा विषय पुन्हा प्रलंबित पडला आहे. सामान्य प्रशासनाकडून गेलेल्या फाईलवर दोन महिन्यानंतर सीईओंनी हे अभिप्राय नोंदविल्याने अनुंकपाच्या भरतीला खोडा बसला आहे. अनुकंपा धारकांना न्याय मिळत नसल्याने या संदर्भात अनुकंपाधारकांचे उपोषण सुरू आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या कार्यकाळात २०१४ मध्ये सरळसेवा भरतीद्वारे विविध संवर्गातील १२७ रिक्त पदे भरण्यात आली होती. मात्र नियमानुसार अनुकंपाची भरती करणे बंधनकारक असतानाही ती करण्यात आली नाही. शासनाच्या आदेशानुसार १० टक्के जागाप्रमाणे १३ अनुकंपाधारकांची भरती होणे अपेक्षीत होते. मात्र त्यावेळी त्यांना भरती करून घेण्यात आले नाही.
त्यानंतर तीन महिन्यापूर्वीच ग्रामविकास विभागाचे अव्वर सचिव भरत पाटील यांनी जि.प.ला अनुकंपाच्या १० टक्के जागा भरती तातडीने करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली. १३ अनुकंपाधारकांच्या प्रस्तावाची छाणनी करण्यात आल्यानंतर शासनाकडून राज्यभरात भरती प्रक्रिया बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ही प्रक्रियादेखील रखडली. मात्र शासनाच्या मार्गदर्शनानंतरदेखील या भरतीच्या फाईल बाबत अनेक त्रुट्या प्रशासनाने काढल्यामुळे हा विषय रेंगाळला आहे.
अनुकंपा भरती बाबत सामान्य प्रशासन विभागाने फाईल सीईओंकडे सादर केली होती. त्यात सीईओंनी ग्रामसेवक पद हे जरी वर्ग ३ मध्ये येत असले तरी हे तांत्रिक पद असून या पदावर अनुकंपाधारकांना पदस्थापना देता येणार नाही, असा अभिप्राय नोंदवत नियमबाह्य प्रस्ताव सादर न करण्याचीदेखील तंबी दिली. परिचर पदावर नियुक्त्या देता येतील मात्र ही पदे रिक्त नाही. परिचर व कनिष्ठ लिपिकांची पदे रिक्त झाल्यानंतर प्रस्ताव सादर करावे अशा सूचना त्यांनी दिल्या आहे. मात्र या मधील उमेदवारांना शिक्षण सेवक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक पदावर नियुक्त्या देता येतील असा सामान्य प्रशासनचा अभिप्राय असून ग्रामसेवक पद हे तांत्रिक स्वरूपाचे नाही असेदेखील स्पष्ट केले आहे. अनुकंपाधारकांची मानसिकस्थिती ढासळली असून ते जि.पत चकरा मारत आहे.