तोडलेली शौचालये पुन्हा त्याच जागी बांधा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:12 AM2020-12-09T04:12:03+5:302020-12-09T04:12:03+5:30
जळगाव : स्वच्छ भारत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून बांधलेली शिवाजीनगर भागातील शौचालये मनपाने तोडली आहेत, तसेच इतर ठिकाणी ...
जळगाव : स्वच्छ भारत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून बांधलेली शिवाजीनगर भागातील शौचालये मनपाने तोडली आहेत, तसेच इतर ठिकाणी नवीन शौचालये बांधण्यात येतील, असे मनपाकडून सांगण्यात आले होते; मात्र दोन महिने होऊनदेखील तोडलेल्या शौचालयांची दुरुस्तीदेखील करण्यात आली नसून, नवीन शौचालयेदेखील बांधण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मनपाने पुन्हा त्याच ठिकाणी शौचालये तयार करावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता युसूफ शहा, तुषार इंगळे, अकील पटेल यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.
थंडीचा जोर कायम
जळगाव - उत्तरेकडूून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढला असल्याने जिल्ह्यात थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमान १२ अंशावर कायम आहे, तसेच आगामी आठवडाभर कोरडे हवामान कायम राहणार असल्याने थंडीच्या प्रमाणात वाढ होऊन तापमान १० अंशापेक्षाही खाली येण्याची शक्यता आहे. थंडीचा जोर वाढल्याने रब्बीच्या गहू, हरभरा या पिकांना फायदा होणार आहे.
स्वखर्चाने नगरसेवकाने गटारीची केली दुरुस्ती
जळगाव - प्रभाग क्रमांक २ मधील जाफर चौक परिसरातील एका वाड्यात गेल्या पंधरा दिवसांपासून गटारीचे सांडपाणी रस्त्यावर येत होते. याबाबत या भागातील नागरिकांनी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सोमवारी दारकुंडे यांनी स्वखर्चाने गटारीची दुरुस्तीचे काम केले आहे. यामुळे गटारीतून रस्त्यावर येणारे सांडपाणी थांबले आहे.
कानळदा रस्त्याचे ढिसाळ काम सुरू
जळगाव - जळगाव शहराकडून जाणाऱ्या कानळदा रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. राजाराम नगर ते केसी पार्कपर्यंत सिमेंटच्या रस्त्याचे काम सुरू असून, हे काम अत्यंत खराब पद्धतीने सुरू आहे. तब्बल २१ गावांना जोडणाऱ्या या रस्त्याचे काम अनेक वर्षांनंतर होत आहे; मात्र खडी व सिमेंटचे प्रमाण कमी असल्याने महिनाभरातच हा रस्ता खराब होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.या कामाबाबत मक्तेदाराला कोणीही जाब विचारत नसल्याने अत्यंत सुमार दर्जाचे हे काम सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
तालुक्यात अघोषित भारनियमन
जळगाव - तालुक्यातील आव्हाणे, फुपनगरी, खेडी, वडनगरी या गावांमध्ये दररोज दोन ते तीन तास सातत्याने वीज पुरवठा खंडित केला जात आहे, तसेच महावितरणकडे विचारणा केली असता, महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही कारण दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. दुपारी व सायंकाळच्या वेळेस अचानक वीज पुरवठा खंडित केला जात आहे. यासह शेतीसाठी देण्यात येणाऱ्या पुरवठ्यातदेखील अनेक वेळा खंड पडत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.