रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा दुकाने बंद करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:17 AM2020-12-06T04:17:16+5:302020-12-06T04:17:16+5:30
जळगाव : शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडून सर्वच व्यवसायांवर मोठा परिणाम होत आहे. यात औषध ...
जळगाव : शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडून सर्वच व्यवसायांवर मोठा परिणाम होत आहे. यात औषध दुकानांमध्येही धूळ बसत असल्याने वारंवार साफ करूनही थोडी धूळ असली तरी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई केली जात आहे. याला कंटाळून औषध विक्रेता संघटनेने एक तर रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा दुकाने बंद ठेवू, असा इशारा दिला आहे.
जळगाव शहरात अमृत योजनेसह विविध कामांमुळे रस्ते मोठ्या प्रमाणात खोदण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात महामार्ग व इतर कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, सर्वच व्यावसायिक त्रस्त झाले आहे. यात औषध विक्रीच्या दुकानावर प्लॅस्टिकचे पडदे लावूनदेखील मोठ्या प्रमाणात धूळ बसत आहे. तसेच नियमांचे पालन व्हावे म्हणून औषध विक्रेते वारंवार साफसफाई करीत आहे. नेमके त्यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आले व थोडी जरी दिसली तरी शेरा मारून कारवाई करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यासंदर्भात डिस्ट्रिक मेडिसीन डीलर असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, रस्त्यांची दुरुस्ती होत नाही हा औषध विक्रेत्यांचा दोष नसला तरी त्यांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी धूळ उडू नये म्हणून पाणी मारले जात आहे. त्या पद्धतीने महापालिकेच्या वतीनेदेखील खराब रस्त्यांवर पाणी टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या वाढत्या धुळीमुळे सर्दी, खोकला व दमाचे रुग्ण वाढत असून, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
कोणतीही चूक नसताना उडणाऱ्या माती व धुळीमुळे औषध विक्रेत्यांवर होणारी कारवाई थांबवावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे व सचिव अनिल झवर यांनी केली आहे.