एटीएम कार्ड बदलून घातला ४२ हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 09:34 PM2019-12-03T21:34:06+5:302019-12-03T21:34:39+5:30
गुन्हा दाखल
जळगाव : एटीएममधून पैसे काढत असताना दोन अनोळखी तरुणांनी एटीएम कार्डची परस्पर अदलाबदल करुन विलास रुपसिंग पाटील (वय ५८, रा़ मेहरूण) यांना ४२ हजार ६८८ रुपयात गंडविल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मेहरुण परिसरातील पाण्याच्या हौदाजवळ संजय पाटील यांच्या घरात विलास पाटील हे पत्नीसह भाडे करारावर राहतात. विलास पाटील हे नवीन बसस्थानकाजवळ झुणका भाकर केंद्रात कामाला आहे. त्यांची पत्नी कुसूम ह्या वरगव्हाण येथे अंगणवाडी सेविका म्हणून नोकरीला आहेत.
पैसे खिशात ठेवताना तरुणांनी बदलले एटीएम
विलास पाटील हे ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११़३० वाजता शहरातील क्रीडा संकुलाजवळील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत पैसे काढण्यासाठी गेले. याठिकाणी सीडीएम मशीन असलेल्या कॅबीनमध्ये जावून त्यांनी दहा हजार रुपये काढले. यावेळी त्याच्या मागे दोन तरुण उभे होते. विलास पाटील काढलेले दहा हजार रुपये काढलेले पैसे खिशात ठेवत असतांना काही सेंकदातच मागे उभ्या तरुणांनी मशीनमधील पाटील यांचे एटीएम काढून त्याजागी दुसरे एटीएम ठेवले.
पासबुक भरुन घेतल्यावर प्रकार समोर
विलास पाटील यांनी पैसे खिशात ठेवल्यावर पुन्हा मशीनमधील एटीएमव्दारे पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे निघाले नाहीत. यादरम्यान उभ्या तरुणांनी पीन नंबर बघून घेतला. यानंतर विलास पाटील निघून गेले. ११ नोव्हेंबर रोजी त्यांनी अडावद येथील स्टेट बँकेच्या शाखेत जावून पासबुक भरले असता, यात ४२ हजार ६८८ रुपये काढून घेतले असल्याचे लक्षात आले. एटीएममध्ये एटीएम कार्डची अदलाबदल करुन याठिकाणी उभ्या तरुणांनी पैसे काढून घेतल्याची माहिती विलास पाटील यांनी पोलिसांना दिली आहे. त्याच्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.