रावेर तालुक्यात उत्तराच्या पावसाने शेतकरीवर्ग सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 04:10 PM2018-09-22T16:10:47+5:302018-09-22T16:11:39+5:30
शुक्रवारी रात्रभर भिज पावसामुळे खरीपासह बागायती पीकांना फायदा
रावेर, जि.जळगाव : तालुक्यात शुक्रवारी रात्री उत्तराच्या पावसाने सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास १५ ते २० मिनिटे दमदार हजेरी लावल्यानंतर रात्री साडेआठ वाजेपासून शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मध्यमस्वरूपाच्या भिज पावसाने संततधार हजेरी लावल्याने शेतकरीवर्ग कमालीचा सुखावला आहे. खरीप हंगाम आताच्या औटघटकेला फलधारणेच्या अवस्थेत असताना वरूणराजाने लावलेली दमदार हजेरी शेतकरीवगार्ला तारणहार ठरली आहे. यातूनच बागायती पीकांसह भूजलसिंचनासाठीही ‘उत्तरा’चा पाऊस लाभदायी ठरणार असल्याने एकच आनंद व्यक्त होत आहे.
तालुक्यात गत तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने ऐन फुल व फलधारणेच्या अवस्थेतील खरीपाची ज्वारी, मका, जिरायत व बागायती कापूस, सोयाबीन, भुईमूग वा तूर आदी पिकांना काहींशी ताण बसली होती. परिणामी खरीपाच्या उत्पादनाला त्याची काहींशी झळ बसून उत्पादनावर विपरीत परिणाम जाणवणार असल्याचे चित्र आहे. तथापि, शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उत्तरा पर्जन्यनक्षत्रातील दमदार पावसाने पुनर्रागमन करीत १५ ते २० मिनीटे तालुक्यात हजेरी लावली. दरम्यान, रात्री साडेआठ वाजेपासून उत्तराच्या पावसाने मध्यम स्वरूपाच्या भिज पावसाने मुक्काम ठोकत आज सकाळी आठ वाजेपर्यंत संततधार कायम ठेवल्याने शेतकरीवर्ग कमालीचा सुखावला आहे. फलधारणेच्या अवस्थेतील ज्वारी, मका, तूर, कपाशी, सोयाबीन व भुईमूग खरीप पीकांसाठी ही अमृत संजीवनी ठरली असून बागायती पिकांसह भूजलसिंचनासाठीही हा उत्तराचा पाऊस अत्यंत उपयुक्त असल्याचे ज्येष्ठांचा सूर आहे.