जळगावात हॉटेलमध्ये आढळलेल्या तांदळात प्लास्टीक नसल्याचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:36 AM2017-09-14T00:36:33+5:302017-09-14T00:37:17+5:30
अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्तांचा खुलासा : अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा व्यापारी महामंडळाचे आवाहन
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 13 - शहरातील एका हॉटेलमध्ये आढळलेल्या तांदळामध्ये प्लास्टिकचे कण आढळून आले नसल्याचा खुलासा अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे.
शहरातील एका हॉटेलमध्ये प्लास्टिक तांदूळ वापरल्याचा दावा 18 ऑगस्ट रोजी काही ग्राहकांनी केला होता व तशी तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केली होती. त्यानंतर या तांदुळाचे नमुने तपासणीसाठी नमुना अन्न विेषक प्रयोगशाळा (पुणे) येथे पाठविण्यात आले होते. त्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून तो तांदूळ खाण्यालायक प्रमाणित आहे, त्यात कोणतेही प्लास्टिक कण आढळलेले नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद शाह यांनी सविस्तर खुलासा प्रसिध्दीस दिला आहे. या पत्रकावरुन ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने केले आहे.
शाह यांनी या अहवालास प्रसिध्दी देताना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर चीनमधून प्लास्टिक तांदूळ, अंडी, फ्लॉवर, साखर यांची भारतीय बाजारात आवक झाली आहे. अशा तक्रारी लक्षात घेवून अन्न व भेसळ प्रतिबंधक प्रशासनाने संपूर्ण भारतात संबंधित वस्तूंचे हजारो नमुने घेतले. त्याची तपासणी केली. त्यात कुठेही प्लास्टिक तांदूळ, अंडे, फ्लॉवर अथवा साखर आढळली नसून जनतेने सोशल मीडियावरील क्लिपवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
जळगावात प्लास्टिक तांदूळ आढळला या अफवेचे खंडन सर्व प्रथम जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने केले होते. आता तांदुळाचा नमुना खाण्यालायक व प्रमाणित आढळला आहे. जनतेने अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा व सरचिटणीस ललित बरडीया यांनी केले आहे.