विद्यापीठाच्या समितीचा अहवाल ठरणार ‘गेमचेंजर’!
By अमित महाबळ | Published: October 1, 2023 06:30 PM2023-10-01T18:30:18+5:302023-10-01T18:31:07+5:30
या विभागातील प्रश्नपत्रिका / उत्तरपत्रिका छपाई आणि सेटिंगचा खर्च साडेआठ कोटींवरून थेट दीड कोटींपर्यंत खाली आणण्यात आला आहे.
अमित महाबळ, जळगाव : कबचौ उमविच्या परीक्षा विभागात गेल्या काही वर्षात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची गंभीर दखल घेत नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल हा गेमचेंजर ठरणार असून, या विभागातील प्रश्नपत्रिका / उत्तरपत्रिका छपाई आणि सेटिंगचा खर्च साडेआठ कोटींवरून थेट दीड कोटींपर्यंत खाली आणण्यात आला आहे.
कोविड काळात विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप सिनेट सदस्य विष्णु भंगाळे व इतरांनी केला होता. या संदर्भात चौकशी समिती नेमण्याची मागणी करण्यात आली होती. २९ मार्च २०२२ रोजी, झालेल्या अधिसभा सभेत समिती नियुक्त करण्याचे अधिकार कुलगुरुंना देण्यात आले होते. त्यानुसार समिती नेमण्यात आली होती. या समितीने जे निष्कर्ष काढले आहेत, त्या आधारे प्रशासनाकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली.
बिलावर सहीला नकार...
गेल्या कार्यकाळात प्रश्नपत्रिका / उत्तरपत्रिकांची छपाई व सेटिंगचे काम करून देणाऱ्या एजन्सीचे २ कोटींचे बिल अडले आहे. सिनेट सदस्यांनी केलेल्या आरोपांनंतर या बिलावर सही करायला अधिकारी तयार नाहीत. या रकमेसाठी संबंधित एजन्सी विद्यापीठाच्या विरोधात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे (डीएलएसए) दाद मागण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणात कारवाईचा मुद्दा सिनेटच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. मात्र, न्यायालयीन प्रकरण झाल्याने त्यावर विद्यापीठाकडून अधिक भाष्य करण्यात आलेले नाही.
सदस्यांच्या आरोपांनंतर काय-काय घडले...
परीक्षा विभागावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर विद्यापाठीने एजन्सी बदलण्याचा निर्णय घेऊन कमी दर देणारी एजन्सी नियुक्त केली आहे. प्राध्यापकांना प्रश्नपत्रिकांचे तयार टेम्प्लेट देणे सुरू केले. त्यावर प्राध्यापकांना केवळ माहिती भरायची असते. त्यामुळे प्रश्नपत्रिका सेटिंग, पेजेसवरील खर्च कमी झाला आहे. प्रश्नपत्रिका मेलवर पाठविणे सुरू केल्याने वाहतुकीचा खर्च वाचला आहे. हे सर्व बदल चालू वर्षीच्या एप्रिलमध्ये झालेल्या सन २१-२२ च्या परीक्षांपासून लागू झाले आहेत.
प्रश्नपत्रिका / उत्तरपत्रिका छपाई व सेटिंग खर्च
वर्ष - रक्कम
सन २०२१-२२ - ८ कोटी ५५ लाख ३७ हजार ६८१ रुपये
सन २०२२-२३ - १ कोटी ४८ लाख ८२ हजार ५३० रुपये