दोन मिनिटावरच्या वॉर्डमध्ये रिपोर्ट पोहोचतो १२ तासांनी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:25 PM2020-07-21T12:25:47+5:302020-07-21T12:25:58+5:30
शासकीय कामाचा नमुना : प्रयोगशाळा झाली तरीही अडचण कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर जळगावसाठी कोरोना चाचणी प्रयोगशाळा जळगावात सुरू झाली खरी; परंतु शासकीय कामकाजाचा प्रत्यय याठिकाणीही पहायला मिळत आहे. कोरोना संशयिताचा रिपोर्ट यायला जेवढा वेळ लागत नाही, त्यापेक्षा जास्त वेळ तो रिपोर्ट कोरोना संशयितांच्या वॉर्डमध्ये पोहोचण्यास लागत आहे. दोन मिनिटावर असलेल्या या वॉर्डमध्ये हा रिपोर्ट पोहोचण्यास १२ ते १८ तास लागत आहेत.
कोरोनाचे निदान होईपर्यंत सर्व रुग्ण हे संशयितांच्या वॉर्डमध्ये ठेवले जातात. त्यामुळे एखाद्याचा रिपोर्ट जेवढा लवकर येईल, तेवढे कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्यादृष्टीने चांगले राहते. कोरोनाचा वाढता प्रसार आणि वाढलेला मृत्यूदर यामुळे जळगावमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळेला मंजुरी मिळाली. यापूर्वी एखाद्या संशयितांचा रिपोर्ट येण्यास तीन ते चार दिवस लागत होते. मात्र जळगावात प्रयोगशाळा झाल्यानंतर हे रिपोर्ट दुसऱ्याचदिवशी येत आहेत. मात्र, रिपोर्ट आल्यानंतर शासकीय कामाच्यागतीने हा अहवाल कोरोना संशयितांच्या वॉर्ड पर्यंत पोहोचण्यास बराच वेळ जात आहे. कारण तब्बल तीन प्रक्रियेतून हा रिपोर्ट जातो.
रिपोर्ट प्रिंट केल्यानंतर तो पहिल्यांदा कार्यालयात जातो, त्यानंतर तो मेडिकल विभागात जातो आणि शेवटी तो वॉर्डमध्ये जातो. जोपर्यंत हा रिपोर्ट लेखी स्वरुपात येत नाही, तोपर्यंत रुग्णही त्यांना अन्य वॉर्डमध्ये हलवू देत नाहीत. हा लेखी अहवाल वॉर्डमध्ये पोहोचण्यासाठी तब्बल १२ ते १८ तास लागतात. विशेष म्हणजे रिपोर्ट ज्याठिकाणी प्रिंट केला जातो, ते कार्यालय अन् वॉर्डमध्ये दोन मिनिटाचंही अंतर नाही.
कोरोना संशयितांचा रिपोर्ट आल्यानंतर पॉझिटीव्ह रुग्णांना दुसºया वॉर्डमध्ये हलवले जाते तर निगेटीव्ह रुग्णांना घरी सोडले जाते वा अन्य रुग्णालयात पाठवले जाते.
निगेटीव्हसाठी वॉर्डच नाही
सध्या कोविड रुग्णालयात कोरोनाचा संशयित रुग्ण निगेटीव्ह आढळला; परंतु त्याला उपचाराची गरज असेल तर त्याला अन्य रुग्णालयात नेण्यावाचून पर्याय राहत नाही. कारण निगेटीव्हसाठी कोविड रुग्णालयात वॉर्डच नाही. अन्य रुग्णालयात रुग्ण नेण्याच्या कामासाठी दोन डॉक्टर्सची नियुक्ती करण्यात आली आहे.