चार केंद्रांच्या संचालकांचे नोंदवले जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:44+5:302021-05-28T04:13:44+5:30
जळगाव : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीअंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान या योजनेत ४७ लाख रुपयांची ...
जळगाव : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीअंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान या योजनेत ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात निमजाई फाउंडेशन अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या चार केंद्रांच्या संचालकांचे गुरुवारी पोलिसांनी जबाब नोंदविले.
दरम्यान, अटकेत असलेला फाउंडेशनचा समन्वयक दीपक नीळकंठ जावळे (२७, रा. नितीन साहित्यानगर, सुप्रीम कॉलनी) याची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपणार असून, त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. चौकशीत त्याच्याकडून बहुतांश माहिती मिळालेली आहे, कागदपत्रे, संचालकांची माहिती, अटकेतील संशयितांची माहिती यांच्यात तफावत आढळून आली आहे. गुरुवारी तपासात काही कागदपत्रे हस्तगत करण्यात आलेली आहेत.
या गुन्ह्याचे तपास अधिकारी संदीप पाटील यांनी गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जळगाव, जामनेर व एरंडोल येथील केंद्रांच्या संचालकांना बोलवले होते. केंद्र सुरू करताना त्यांनी सादर केलेली कागदपत्रे सादर केलेली होती याची पडताळणी करून या संचालकांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यात दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती तपासाधिकारी पाटील यांनी दिली.