अवैध धंद्याची तक्रार केल्याने घरात घुसून कुटुंबावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:20 AM2021-08-12T04:20:01+5:302021-08-12T04:20:01+5:30
जळगाव : अवैध धंद्याची पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून दत्तू कोळी, विक्की कोळी व भरत सपकाळे यांच्यासह ...
जळगाव : अवैध धंद्याची पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून दत्तू कोळी, विक्की कोळी व भरत सपकाळे यांच्यासह १५ जणांनी लोखंडी रॉड व लाठ्या-काठ्या घेऊन विवेकानंद नगरातील अलका विनोद कोचुरे यांच्या घरात घुसून कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. त्यात शुभम विनोद कोचुरे हा गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्याची तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी विलंब केला तसेच प्राणघातक हल्ल्याचे कलमही लावले नाही. या हल्ल्याला हल्लेखोर जितके जबाबदार आहेत, तितकेच पोलीसही जबाबदार असल्याचा आरोप पराग घनश्याम कोचुरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
कोचुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम कोचुरे यांचे गिरणा पंपिंग रोड येथे पोल्ट्री फार्म असून त्याच्या शेजारीच राजश्री राजू देशमुख हे वास्तव्याला आहेत. राजश्री यांचा दत्तू कोळी, विक्की कोळी व भरत सपकाळे यांच्याशी यापूर्वी वाद झालेला आहे. त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल असून त्यात साक्षीदार म्हणून शुभम आहे. त्याशिवाय अवैध धंद्यांवर कारवाई झाली तेव्हादेखील शुभम साक्षीदार आहे. दत्तू कोळी याचा सट्टा, जुगार व इतर अवैध व्यवसाय आहे. त्याची तक्रार केल्यामुळे त्यांचा राजश्री देशमुख व शुभम यांच्यावर राग आहे. त्यातूनच जुन्या भांडणाचे निमित्त करून ८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता दत्तू कोळीसह १५ जणांनी शुभम याच्या घरात घुसून कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. त्यात शुभमसह त्याची आई अलका विनोद कोचुरे या गंभीर जखमी झाल्या. यात त्यांनी टीव्ही, फ्रीजसह इतर साहित्याची तोडफोड केली आहे. घटनेची तक्रार द्यायला गेल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. यापूर्वी राजश्री यांनी दिलेल्या तक्रारीचीही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या कानावर हा प्रकार घातल्यानंतर संशयितांविरुद्ध दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. त्यातही प्राणघातक हल्ल्याचे ३०७ हे कलम लावले नाही. यात पोलिसांनी हल्लेखोरांना मदतच केल्याचा आरोप कोचुरे यांनी केला आहे. तुम्ही कुठेही जा, आम्ही पोलिसांना पैसे देतो, आमचे काहीच होणार नाही, असे सांगून हल्लेखोरांनी दम भरला होता. पोलिसांनीही गुन्हेगारांना मदत केल्याने त्यांच्या सांगण्यात तथ्य निघाल्याचे कोचुरे म्हणाले.
तिघांना अटक; पोलीस कोठडी
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर यांनी संशयितांच्या शोधार्थ पथक रवाना केले. दत्तू विश्वनाथ कोळी (३०, म्युनिसिपल कॉलनी), चंद्रकांत सुरेश मोरे (३०, रा. हरिविठ्ठल नगर) व विक्की महेंद्र कोळी (१९, रा. समतानगर) या तिघांना अटक करण्यात आली. हवालदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, प्रवीण जगदाळे व सुनील पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.