दोनही कोरोना बाधीत महिलांच्या जुळ््यांचे अहवाल आले निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 01:17 PM2020-05-25T13:17:52+5:302020-05-25T13:18:03+5:30
जळगाव : कोरोना रुग्णालयात जन्मलेल्या चार चिमुकल्यांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने अवघ्या काही दिवसांच्या या चिमुकल्यांवरचे कोरोना संकट दूर ...
जळगाव : कोरोना रुग्णालयात जन्मलेल्या चार चिमुकल्यांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने अवघ्या काही दिवसांच्या या चिमुकल्यांवरचे कोरोना संकट दूर झाले आहे़ विशेष म्हणजे यातील एका मातेचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर पाच दिवासांच्या विरहानंतर दोन चिमुकले आपल्या मातेच्या कुशीत पोहचू शकले.
कोरोना रुग्णालयात जळगाव येथील एका गर्भवती महिलेला त्रास व्हायला लागल्याने नेत्र कक्षात असलेल्या शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आले़ या ठिकाणी डॉक्टरांनी सिझेरीयन केले़ या महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला़ दोघांची व मातेची प्रकृती स्थिर होती़ त्या वेळी बाळांचे स्वॅब घेण्यात आले. महिला आधीच दहा दिवस दाखल असल्याने नंतर पाच दिवसांनी या महिलेचे पुन्हा स्वॅब घेण्यात आले ते निगेटीव्ह आल्यानंतर महिलेला बाळांसह २० मे रोजी घरी सोडण्यात आले़ कोरोनावर मात केल्याने माता व बालके पुन्हा एकत्र आले आहेत़ दरम्यान, २१ मे रोजी भुसावळच्या एका बाधित महिलेने जुळ्यांना जन्म दिला होता़ या दोघांसह त्यांच्या वडिलांचेही तपासणी अहवाल निगेटीव्ह आले़
दुसऱ्या आईची मात्र परीक्षा
भुसावळच्याही एका महिलेने दोन दिवसांपूर्वी जुळ्यांन जन्म दिला. यात एक मुलगा व एका मुलीचा समावेश आहे़ ही मात बाधित असल्याने बाळांना या मातेपासून आणखी काही दिवस दूर राहावे लागणार आहे़ आधीच्या केसमध्ये मातेला पाच दिवस बाळांपासून दूर राहावे लागले होते़ या मातेला त्यापेक्षा अधिक काळ दूर राहावे लागणार आहे़
गर्भाशयात नाळद्वारे या विषाणूचा संसर्ग होत नाही. आतापर्यंत असेच समोर आले आहे़ संसर्ग हा बाळाचा जन्म झाल्यानंतर आईचा स्पर्श किंवा बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने होतो़ आई बाधित असल्याने पाच दिवस बाळांना अगदी वेगळे ठेवले होते़ दक्षता म्हणून त्यांचेही स्वॅब घेतले होते़ ते निगेटीव्ह आले़
- डॉ़ किरण पाटील, वैद्यकीय अधीक्षक,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय