नोकरीचे आमिष दाखवत दोन वेळा केला अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:46 PM2019-06-15T12:46:42+5:302019-06-15T12:48:26+5:30
महिला विक्री प्रकरण : तीनही आरोपींना कोठडी
जळगाव : वाकडी, ता.जळगाव येथील एका विवाहितेला शिरपूर तालुक्यात विक्री करण्याचा प्रयत्न नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने हाणून पाडला होता. यात अटक केलेल्या आरोपीने दोन वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्याच्यासह अन्य दोन महिलांना १७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडी, ता.जळगाव येथील विवाहितेला पतीने सोडून दिलेले होते. तिला एक मुलगा आहे. रुदावली, ता.शिरपुर येथील जिभाऊ अंबरसिंग सोनवणे याच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्याला दोन मुले आहेत. तो नवीन लग्नाच्या तयारीत होता. त्याच्यापर्यंत फिर्यादी महिलेस लताबाई संतोष सोनवणे (२५, रा. बोरनार रोड, म्हसावद ता. जळगाव) व बुटाबाई पिंटू उर्फ राजेंद्र चंदनशिव ( ३५ रा. खर्चे नगर म्हसावद ता. जि. जळगाव) यांनी या महिलेस रूदावली ता. शिरपूर येथील जिभाऊ अंबरसिंग सोनवणे यांच्यापर्यंत पोहोचविले असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांनाही गुरूवारी रात्री एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरूद्ध संगनमत, दमदाटी, दागिने बळजबरीने काढून घेणे व अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
नोकरीचे दाखविले अमिष
फिर्यादी महिलेले पोलिसांना दिलेल्या जबाबात तिला अगोदर लताबाई सोनवणे हिने मी तुला कामावर लावून देते असे सांगून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत, कानातील चाप काढून घेतले. यानंतर बुटाबाई चंदनशिव हिने फिर्यादीस रूदावली ता. शिरपूरला जिभाऊ अंबरसिंग सोनवणे याच्याकडे रवाना केले.
दोन वेळा केला अत्याचार
जिभाऊ सोनवणे याच्याकडे फिर्यादी महिलेस पाठविल्यावर त्याने तिला स्वत:च्या घरी ठेऊन घेत दोन वेळा दमदाटी करत अत्याचार केल्याचे फिर्यादी महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
१७ पर्यंत कोठडी
तीनही आरोपींना शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयात हजर करून १७ पर्यंत पोलीस कोठडीचे मागणी केली होती. आरोपीविरूद्ध स्त्री लैंगिक अत्याचार संदर्भातील गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असून फिर्यादीस त्यांनी पळवून नेले आहे. फिर्यादी महिलेस आरोपींनी कोठेकोठे नेले तसेच तिच्या अंगावरील दागिने कोठे ठेवले याची चौकशी करायची असल्याचे न्यायालयात सांगिलते. त्यानुसार न्यायालयाने पोलीस कोठडी दिली.