बहिणाबार्इंच्या काव्यातील श्रमाची प्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:12 PM2018-05-19T23:12:36+5:302018-05-19T23:12:36+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘स्मृतीची चाळता पाने’ या सदरात जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक ए.बी. पाटील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्याविषयी विविध अंगांनी लिहित आहेत. त्यात आजच्या लेखात बहिणाबार्इंच्या काव्यातील श्रमाची प्रतिष्ठा लिहिताहेत.

The reputation of the work of Bahinabai's poetry | बहिणाबार्इंच्या काव्यातील श्रमाची प्रतिष्ठा

बहिणाबार्इंच्या काव्यातील श्रमाची प्रतिष्ठा

Next


बहिणाबार्इंच्या काव्यातील वेगवेगळ्या पैलूंवर विद्वानांनी प्रकाश टाकला आहे. मला वाटतं, बहिणाबाईच्या काव्यातील अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे श्रमाची प्रतिष्ठा! बहिणाबार्इंचं माहेर व सासर दोघेही शेतकरी परिवार. अपार कष्ट व श्रम त्यांच्या पाचवीलाच पुजलेले. पण बहिणाबाईने श्रमाबद्दल कधी अनिच्छा किंवा नावड व्यक्त केलेली नाही. उलट त्याचा पुरस्कारच केलेला आहे.
मला हिंदू धर्म परंपरेचे आश्चर्य वाटते. हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या तीन देवता जन्म, भरण-पोषण व संहार यासाठी मानल्या जातात.
त्याचप्रमाणे विद्येची सरस्वती, धनाची लक्ष्मी, अग्नीची, वायूची, पर्जन्याची सगळ्यांच्या देवता मानल्या गेल्या आहेत. एवढेच नाही तर मृत्युचीही देवता मानली गेली आहे.
पण मानवी जीवनात अतिशय महत्त्वाच्या असलेल्या श्रमाची देवता नाही. असे का? कदाचित चातुर्वर्ण्य व्यवस्थेत याचे उत्तर असावे. पण बहिणाबाईने श्रमाची प्रतिष्ठा जपली व श्रम करणाऱ्याला प्रतिष्ठा दिली.
ज्यावेळी भीषण दुष्काळ पडला, अन्नधान्य संपले त्यावेळी खडी फोडण्याचे अत्यंत कष्टप्रद काम बहिणाबाईने केले. बहिणाबाई प्रत्यक्ष कर्म करण्यावर भर देणारी होती. कुठल्याही प्रकारचे काम करण्यात तिला कमीपणा वाटत नव्हता. ती दैववादी नव्हती तर कर्मवादी होती. म्हणूनच तिने म्हटले आहे...
‘नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू
माझे दैव मला कये, माझ्या दारी नको येऊ।’
स्वत:च्या कर्तृत्वावर केवढा हा विश्वास! ऐन तारुण्यात वैधव्यासारखे भीषण दु:ख कोसळल्यावर ‘जरी फुटल्या बांगड्या मनगटी करतूत’ म्हणणारी बहिणाबाई खरोखरच असामान्य होती.
कष्टाचं मोल काय आहे, हे ती जाणत होती. बहिणाबाई सश्रद्ध होती. तिचा देवावर विश्वास होता, पण तिचा देव टाळ्या पिटून भेटणारा नव्हता तर,
‘ज्याच्या हाताले घट्टे त्याला देव भेटे’ अशा प्रकारचा होता.
बहिणाबाई सश्रद्ध होती, पण अंधश्रद्ध नव्हती. भूतांवर तिचा विश्वास नव्हता. तुळशीराम एकतारीवाल्यावरून बाबा भटजीशी झालेल्या संवादानंतर सोपानदेवांना तिने केलेला, ‘कां रे, जे खरं खरं असतं ते शास्त्रात नसतं का?’ हा प्रश्न तिची चिकित्सक व तार्किक विचारसरणी स्पष्ट करतो.
बहिणाबाईला देवळातल्या देवापेक्षा नामदेवाच्या कीर्तनात नाचणारा, एकनाथाघरी चंदन घासणारा, जनाईबरोबर दळणारा, सावताबरोबर निंदणी-खुरपणी करणारा, कबिराचे शेले विणणारा, चोखोबाबरोबर ढोरे ओढणारा विठ्ठल अधिक प्रिय होता. म्हणूनच तिचं मन गीता-भागवत ग्रंथात नव्हतं तर काळ्या मातीत पावसाच्या पाण्याने अंकुरणाºया पिकात होतं.
(क्रमश:)

Web Title: The reputation of the work of Bahinabai's poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.