भुयारी गटार योजनेचे काम बळिराम पेठमधील रहिवाशांनी केले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:37 AM2021-01-13T04:37:41+5:302021-01-13T04:37:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात सुरू असलेल्या भुयारी व पाणीपुरवठा योजनेच्या कामांमुळे रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे. मात्र, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात सुरू असलेल्या भुयारी व पाणीपुरवठा योजनेच्या कामांमुळे रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे. मात्र, खोदकाम झाल्यानंतर रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती केली जात नसल्याने बळिराम पेठ भागात सुरू झालेले भुयारी गटार योजनेचे काम सोमवारी (दि. ११) रात्री नऊ वाजता स्थानिक रहिवाश्यांनी बंद पाडले आहे. चांगले रस्ते खोदल्यानंतर महापालिकेकडून ते दुरुस्त केले जात नाहीत. त्यामुळे महापालिका खोदलेले रस्ते २४ तासांच्या आत दुरुस्त करण्याचे आश्वासन देत नाही तोवर हे काम सुरू न होऊ देण्याची भूमिका या भागातील रहिवाशांनी घेतली आहे.
शहरात गेल्या अडीच वर्षांपासून अमृत याेजनेअंतर्गत भुयारी व पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. यामुळे शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. सोमवारी रात्री नऊ वाजता बळिराम पेठ भागात सुरू असलेले भुयारी गटार योजनेचे काम नागरिकांनी बंद पाडले आहे. महापालिकेसमोरील रस्त्याची दुरुस्ती एकाच दिवसात पूर्ण केल्याप्रमाणेच या भागातील रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. तसेच याबाबतीत महापालिकेने लेखी आश्वासन द्यावे, अशीही भूमिका नागरिकांनी घेतली आहे. जोपर्यंत आश्वासन मिळणार नाही तोवर हे काम सुरू होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली असून, मंगळवारी दिवसभर या भागातील काम बंदच होते.