विविध असुविधांमुळे रहिवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:16 AM2021-07-30T04:16:17+5:302021-07-30T04:16:17+5:30
भुसावळ : येथील प्रभाग क्रमांक १७ मधील गौसिया नगर भागात पाणीपुरवठा, साफसफाई आणि पथदिव्यांची समस्या भेडसावत आहे. पालिका ...
भुसावळ : येथील प्रभाग क्रमांक १७ मधील गौसिया नगर भागात पाणीपुरवठा, साफसफाई आणि पथदिव्यांची समस्या भेडसावत आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन परिसरातील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा सचिव व राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना निवेदन देण्यात आले आहे.
कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कचरा वेळेवर उचलला जात नाही. मुस्लिम धर्माच्या पवित्र प्रार्थनास्थळाला लागून असलेल्या परिसरात कचराही वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील गटारींमधील कचरा नियमितपणे काढला जात नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गटारींमधून पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने हे पाणी रस्त्यावर साचून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चिखल जास्त प्रमाणात झालेला आहे.
अंधारामुळे चोरीचे प्रकार वाढले
रात्रीच्या वेळेस पथदिवे मुळीच चालू होत नाहीत. यामुळे अंधाराचा फायदा उचलून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही अद्यापही यावर तोडगा काढण्यात आलेला नाही.
या सर्व मूलभूत सुविधा नगरपालिकेने न सोडविल्यास या भागातील रहिवासी आंदोलन करतील, असा इशारा अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे शेख इम्रान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष समीर शेख, शेख मुख्तार, जहांगीर मन्यार, वसीम शेख, रोशन शेख, मोहसिन शेख, आरिफ बागवान, नजीम शेख, समीर शेख, फरीद अल्ताफ शेख, शोएब मणियार, फारुख खान, साबिर पैलवान, जबा पैलवान आदींनी दिला आहे.