ग.स.अध्यक्ष व उपाध्यक्षांचा राजीनामा फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 10:03 PM2017-10-02T22:03:38+5:302017-10-02T22:04:13+5:30
जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या (ग.स.सोसायटी) अध्यक्ष व उपाध्यक्षांनी रविवारी सहकार पॅनलचे अध्यक्ष बी.बी.पाटील यांच्याकडे दिलेले राजीनामे फेटाळण्यात आले आहेत.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२-जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या (ग.स.सोसायटी) अध्यक्ष व उपाध्यक्षांनी रविवारी सहकार पॅनलचे अध्यक्ष बी.बी.पाटील यांच्याकडे दिलेले राजीनामे फेटाळण्यात आले आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्षांना पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, भुसावळ येथील ग.स.सोसायटीच्या नवीन इमारतीचे उदघाटन झाल्यानंतर राजीनामे स्विकारले जाणार असल्याची माहिती ग.स.मधील सूत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
ग.स.सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम बोरोले व उपाध्यक्ष महेश पाटील यांचा एक वर्षाचा कार्यकाळ २ आॅक्टोबर रोजी संपला. त्यानिमित्त रविवारी ग.स.सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सहकार पॅनलचे प्रमुख बी.बी.पाटील यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती मिळाली. यावृत्तास बी.बी. पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
बोरोलेंच्या कार्यकाळात भुसावळच्या इमारतीचे काम
अध्यक्ष तुकाराम बोरोले यांच्या वर्षभराच्या कार्यकाळात भुसावळ येथील ग.स.सोसायटीच्या कार्यालयाचे काम झाले आहे. तसेच या इमारतीचे उद्घाटन आठवड्याभरात होणार आहे. त्यामुळे बोरोले यांच्या कार्यकाळात तयार झालेल्या इमारतीचे उदघाटन देखील त्यांच्याच कार्यकाळात व्हावे असे मत बी.बी.पाटील यांनी रविवारच्या बैठकीत व्यक्त केले. त्यांच्या मताला उपस्थित संचालक मंडळाकडून देखील पाठिंबा देण्यात आला. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षांचा राजीनामा फेटाळण्यात आला आहे.
इन्फो-
उद्घाटनावेळी स्विकारले जातील राजीनामे
येत्या आठवड्याभरात भुसावळ येथील इमारतीचे उदघाटन होण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी ग.स.अध्यक्ष व उपाध्यक्षांचे राजीनामे स्विकारले जाणार आहेत. मात्र नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड ही दिवाळीनंतरच होणार आहे. २२ आॅक्टोबर रोजी नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी इच्छुकांकडून सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.
कोट..
अध्यक्ष तुकाराम बोरोले व उपाध्यक्ष महेश पाटील यांचा कार्यकाळ २ आॅक्टोबरला संपल्यामुळे त्यांनी रविवारी आपले राजीनामे माझ्याकडे सोपविले. मात्र ते राजीनामे स्विकारण्यात आले नाहीत. येत्या आठ दिवसात ते राजीनामे मंजूर करण्यात येतील.
-बी.बी.पाटील, सहकार पॅनल प्र्रमुख