जळगाव कृउबात शेतकऱ्यांना लागू करणार हिशेबपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:27 AM2017-12-08T11:27:13+5:302017-12-08T11:32:34+5:30
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर अतिरिक्त वसुलीच्या फटक्यास बसणार ‘ब्रेक’
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.८ : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांना नियमानुसार हिशेबपट्टी लागू करावी, अशी ठाम भूमिका समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. यासंदर्भात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी गुरुवारी झालेल्या बैठकीत संबंधित व्यापाऱ्यांनी काही दिवसांची मुदत मागितली आहे.
शेतकऱ्यांना हिशेबपट्टी लागत नसल्याने कच्ची पावती दिली जाते. यात त्यांना हमाली, आडत कमिशन आदी जादाचे पैसे मोजावे लागतात. हिशेबपट्टी लागल्यावर हे अतिरिक्त शुल्क लागणार नाही. यामुळे नवनिर्वाचित सभापती लकी टेलर यांनी हिशेबपट्टी लागू करण्याचा आग्रह धरला आहे.
यासंदर्भात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या मुख्य उपस्थितीत दुपारी ४ वाजता पदाधिकारी व संचालक तसेच व्यापारी आणि शेतकरी यांची बैठक झाली. या वेळी सुरेशदादा यांनीही जे नियमानुसार आहे तेच झाले पाहिजे, याचा आग्रह धरला. यासाठी काही व्यापारी राजी झाले तर काहींनी काहीच निर्णय दिला नाही. यामुळे काही दिवसांची मुदत व्यापाऱ्यांनी मागितली आहे.
लिलाव रजिस्टरमध्ये नोंद नसल्याने नुकसान
मागे ९०० शेतकऱ्यांनी कांदा बाजार समितीत विकला होता. या वेळी शासनाकडून मिळणारे अनुदान मात्र ६०० शेतकऱ्यांनाच मिळाले. ३०० शेतकऱ्यांची नोंद लिलाव रजिस्टरला नसल्याने त्यांचे नुकसान झाले. यामुळेच नियमानुसारच कामे झाली पाहिजेत असा आपला आग्रह असल्याचे सभापती लकी टेलर यांनी सांगितले. बैठकीस अनिल भोळे, वसंत भालेराव, शशी बियाणी आदी संचालकांसह भाजीपाला असो. चे अध्यक्ष आत्माराम माळी, चुडामण पाटील, राजेश भाटिया, गुलाब सेठीया, कर्मचारी संघटनेचे सचिव रवी नारखेडे, प्रमोद काळे, कैलास शिंदे, वासुदेव पाटील तसेच शेतकरी उपस्थित होते.