स्वस्ताईने ग्राहकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 08:55 PM2018-11-24T20:55:53+5:302018-11-24T20:56:17+5:30

डाळींची भाववाढ थांबण्यासह कांदे, वांगे तसेच इतरही भाजीपाल्यामध्ये घसरण

Resolve customers comfortably | स्वस्ताईने ग्राहकांना दिलासा

स्वस्ताईने ग्राहकांना दिलासा

Next

विजयकुमार सैतवाल
जळगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेली डाळींची भाववाढ थांबण्यासह कांदे, वांगे तसेच इतरही भाजीपाल्यामध्ये घसरण होऊन आलेली स्वस्ताई ग्राहकांना दिलासा देणारी ठरत आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून सतत सुरू असलेली भाववाढ ग्राहकांसाठी चिंता वाढवित होती. सोबतच भाज्यांचेही दर आवाक्यात नव्हते. मात्र आता या सर्व वस्तू आवाक्यात आल्या आहेत. डाळींच्या भावात या आठवड्यात ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून उत्पादन घटसह दर्जावरही परिणाम झाला आहे. त्यात डाळींसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या उडीद, मुगाला ऐन पाण्याची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने त्यांचे उत्पादन कमी होऊन कडधान्याची आवक घटली व गेल्या तीन आठवड्यांपासून डाळींच्या भावामध्ये दर आठवड्याला तेजी येत होती. बाजारात एक तर आवक कमी व मागणी जास्त असल्याने सर्वच डाळींचे भाव वाढत गेले. तीन आठवड्यात भाव वाढ होत जाऊन उडीदाची डाळ ६९०० रुपये प्रती क्विंटल पोहचली होती. तसेच हरभरा डाळ ६६०० रुपये प्रती क्विंटल, तूरडाळ ७००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली होती. मात्र सलग भाववाढीमुळे या आठवड्यात मागणी तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे उडीदाच्या डाळीचे भाव ६००० ते ६४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. अशाच प्रकारे ६६०० रुपये प्रती असलेल्या हरभरा डाळीचे भाव ६००० ते ६४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. तर तूरडाळ ७००० रुपये प्रती क्विंटलवरून ६००० ते ६८०० रुपये प्रती क्विंटलवर आली आहेत. मुगाची डाळ मात्र ७५०० ते ८००० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे.
नवीन उडीद-मूग आल्यानंतर या दिवसात नवीन डाळींचीही आवक होते. त्यामुळे जळगावातील दालमिलमधून मोठ्या प्रमाणात डाळी निर्यातही होतात. मात्र यंदा आवकच कमी असल्याने डाळींचे उत्पादनही २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. असे चित्र असताना भावात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
या सोबतच कांद्याची आवक दुपटीने वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याचे भाव निम्यापेक्षाही कमी होऊन जळगाव कृषी बाजार समितीमध्ये कांदा केवळ २ रुपये प्रती किलोने खरेदी केला जात आहे.
या सोबतच भाजीपाल्याची आवक वाढून भावकमी झाले आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत वांगाच्या भावात ४०० रुपये प्रती क्विंटलने घट होऊन वांगे ९०० रुपये प्रती क्विंटलवरून ५०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. सोबतच कांदा, भेंडी, कारले, वांगे यांचे भावदेखील कमी झाले आहे.
हिवाळ््याच्या सुरुवातीपासून तसे वांग्याची आवक वाढून कमी होत असतात. मात्र मध्यंतरी वांग्याची आवक कमी होऊन तीन आठवड्यांपूर्वी केवळ २२ क्विंटल वांग्याची आवक झाली होती. त्यामुळे भाव वाढ होऊन ते १२०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले होते. मात्र या आठवड्यात वांग्याची आवक वाढून गेल्या आठवडयात ९०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या वांग्याच्या भावात थेट ४०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते ५०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. भाव कोथिंबीरचेही भाव ५०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते २५०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत.

Web Title: Resolve customers comfortably

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.