गावासह जिल्ह्याला कोरोनामुक्त करूच असा संकल्प करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:30+5:302021-06-09T04:21:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना महामारीने आपल्याला जखडून ठेवले आहे. विकासात्मक कामे करण्यास कोरोना वेळ देत नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना महामारीने आपल्याला जखडून ठेवले आहे. विकासात्मक कामे करण्यास कोरोना वेळ देत नाही. कोरोनाने आपल्या अनेक स्वजनांना हिरावून घेतले आहे. त्याला आता आपण हरविले नाही तर आपल्या पुढील पिढ्यांना तो त्रासदायक ठरेल. यामुळे कोरोनाशी दोन हात करून त्याला कायमचा हद्दपार करा. कोरोना मुक्तीची चळवळ तयार करून गावासह जिल्ह्याला, राज्याला कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.
कोरोनामुक्त गाव अभियाना अंतर्गत त्यांनी सोमवारी नाशिक विभागातील कोरोनामुक्त गावांच्या सरपंचाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा विज्ञान व सुचना कार्यालयातून पहूरपेठ (ता. जामनेर) येथील सरपंच नीता रामेश्वर पाटील, सारोळा खुर्दचे (ता. पाचोरा) सरपंच सीमा पाटील, विरावाडे (मालापूर) (ता. चोपडा) येथील विशाल म्हाळके, मालोद (ता .यावल) येथील हसीना सिराज तडवी हे जिल्ह्यातील चार सरपंच व्हीडीओ काॅन्फरन्सव्दारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे, यावल पंचायत समितीचे एच.एम.तडवी उपस्थित होते. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार हेही सहभागी झाले होते.
१०७९ ग्रामपंचायती कोरोनामुक्त...
कोरोना महामारीला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व ग्रामस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. यामुळे जिल्ह्यातील १ हजार १५७ ग्रामपंचायतींपैकी १ हजार ०७९ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील ६६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले. त्यामुळे या गावांमध्ये एकही बाधित आढळला नसल्याचे दिलासादायक चित्र आहे. कोरोनामुक्त गाव अभियानात जिल्ह्यातील सरपंचांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला.
१२०० कुटूंबांना अन्नधान्य देण्याची केली व्यवस्था
पहूरपेठ (ता. जामनेर) येथील सरपंच नीता पाटील यांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्या म्हणाल्या, की गावातील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच प्रतिबंधात्मक उपाययोजना गावात आखल्या गेल्या. सॅनिटायझेशनचा वापर, मास्कचा वापर अनिवार्य केला. स्वच्छता पाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली. लोकसहभागातून कोरोनाला रोखण्याचे काम केले. संचारबंदी असल्याने १२०० कुटूंबांना अन्नधान्य देण्याची व्यवस्था लोकसहभागातून केली, असे त्यांनी सांगितले.