Ganpati Festival शिंदीच्या माळरानात ‘जंगलाचा राजा’ च्या मंदिराचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 09:05 PM2018-09-18T21:05:31+5:302018-09-18T21:08:29+5:30
संजय हिरे
खेडगाव, ता.चाळीसगाव : लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव थेट महाराष्ट्राच्या घराघरात नव्हे तर रानावनात सुध्दा पोहचला आहे. त्याचे उदाहरण म्हणजे शिंदी गावाला लागुन असलेल्या व जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या वनक्षेत्रात गुरे सांभाळणारे गुराखी २५ वर्षांपासून याकाळात गणरायाची स्थापना करीत आहेत. ती आजतागायत सुरु आहे. एवढेच नव्हे तर तब्बल ९ लाख खर्च करुन, आपल्या या 'जंगलाच्या राजा, चे भव्य मंदीर साकारण्याचा संकल्प करीत त्याचे निर्माण सुरु केले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात जंगलात हिरवे गवत मुबलक उपलब्ध असल्याने. सकाळी गुरे रानात सोडतांना व संध्याकाळी गुरे परत येतांना गोरजमुहूर्तावर' सिताड, (सिता वनवासकाळात या डोगंररागेतुन मार्गस्थ झाली) गणरायाच्या आरतीच्या स्वरांनी भारावुन जावु लागली. याठिकाणावरून जाणारा व मराठवाडा -खानदेशला जोडणा-या मार्गाने येणाºया जाणारे भाविकदेखील आपसुकच हात जोडुन दर्शन घेतात.
गुराखी बांधव आपल्यातुन वर्गणी जमा करीत या काळात महाप्रसाद ठेवत. ही परंपरा आजही सुरु आहे. फक्त वनविभागाने हरकत घेतल्याने हद्दीबाहेर वरील मार्गालगत शेड उभारुन तिथे जंगलाचा राजा ची प्राणप्रतिष्ठा गुराख्यांनी केली. रानातील निरव शांतता, वाहणारे झरे, समोरील हिरवीगार डोंगररांग, शांततेचे भंग करणारे महामार्गाने जाणारे एखादे वाहन असे डोळ्याला सुखावणारे व मनाला प्रसन्न करणारे वातावरण या दिवसात येथे अनुभवास मिळते. याआधी जमविलेल्या पंधराशे इतक्या निधीतुन पैसा उभा राहत तो आज सात लाखावर जमा झाला आहे.
सर्व कार्याषु आरंभे...अशा गणरायाची प्रार्थना कोणतेही कार्य सुरु करण्याआधी केली जाते. त्यास शिंदी(ता-भडगाव ) येथील गुरे पाळणारे देखील अपवाद कसे राहतील? जंगलात चरावयास सोडलेली आपली गुरे बाप्पा सुरक्षित राखतो या श्रध्तेतुन साधारणपणे २५ वषार्पूर्वी जंगलाच्या सुरवातीला असलेल्या (गुरे वनात चारण्यासाठी नेण्याचे प्रवेशद्वार) चिंध्या देवाच्या बरडीवर गुरे चारणा-या गुराख्यांनी एकत्र येत मातीच्या गणपतीची गणेशोत्सव काळात स्थापना केली.
आपल्या या लाडक्या जंगलाचा राजाचे भव्य-दिव्य मंदीर साकारण्याचा संकल्प करीत. गणेशोत्सवाच्या पवित्र काळात १८ रोजी विधीवत पुजन करुन मंदीर उभारण्याच्या कामास प्रारंभ झाला. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींच्या हस्ते नव्हे तर शंभर वर्षाचा पशुपालनाचा विक्रम असलेल्या खेडगाव येथील दिलीप विक्रम पाटील यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. गावातीलच तुकाराम व्यंकट मोरे व खंडा मोरे या बंधुनी वनक्षेत्राबाहेरील आपली जागा मंदीर निर्माणासाठी मोठ्या भक्तीभावाने देऊ केली. शिंदीच्या माळरानावर गणपती बाप्पा मोरया...! चा गजर होत नारळ फुटले.