निवडणुकीच्या तोंडावर प्रवाशांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 06:22 PM2019-01-19T18:22:34+5:302019-01-19T18:24:37+5:30
राजधानी एक्सप्रेसचीदेखील मागणी पूर्ण
सचिन देव
जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून सचखंड एक्सप्रेस, महानगरी एक्सप्रेस या गाड्यांना पाचोरा, चाळीसगाव या ठिकाणी थांबा मिळण्याची प्रवाशी संघटनांकडून मागणी सुरु होती. भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर साडेचार वर्षांत या पैकी कुठलीही मागणी मान्य होत नसल्यामुळे प्रवाशी संघटनांकडून खासदारांकडे पाठपुरावा सुरु होता आणि पुढील आठवड्यात या दोन्ही गाड्यांना पाचोरा व चाळीसगाव या टिकाणी थांबा मिळणार असल्याने प्रवाशाांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, साडेचार वर्षांपासून सुरु असलेल्या पाठपुराव्याला आत्ताच फळ मिळाल्यामुळे, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवाशांना खूष करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या गुलाबी थंडीत जोरदार सुरु आहे.
भाजपा सरकार सत्तेत येण्यापूर्वी पासून अनेक लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्यांना जळगाव व भुसावळ व्यक्तीरिक्त कुठल्याही स्थानकावर थांबा नव्हता. या मुळे प्रवाशांना जळगाव किंवा भुसावळला जाऊन ही गाडी पकडावी लागायची. चाळीसगाव ते भुसावळ दरम्यान दररोज दोन हजार चाकरमानी अफडाऊन करत असतात. सकाळ व सायंकाळ धावणारी पँसेजर व इतर ठराविक गाड्यानांच थांबा असल्यामुळे प्रवाशांची अफडाऊनसाठी तारेवरची कसरत व्हायची. जर यदा कदाचीत गाडी सुटली तर तिप्पट भाडे खर्च करुन, चाळीसगावहून जळगावला यावे लागायचे व यामुळे मनस्तापदेखील व्हायचा.
शेवटी प्रवाशांच्या पाठपुराव्याला निवडणुकीच्या तोंडावर का असेना, यश मिळाल्यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर त्रास वाचणार आहे. तसेच अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या राजधानी एक्सप्रेसचीदेखील मागणी पूर्ण झाल्यामुळे, प्रवाशांच्या आनंदाला पारा उरलेला नाही. सोशल मीडियावर प्रवाशी संघटनांकडून तर खासदार ए. टी. पाटील व खासदर रक्षा खडसे यांच्या आभाराचे दर सेंकदाला बँनर झळकत आहेत. दुसरीकडे प्रवासी संघटनांमध्येदेखील ‘श्रेय’ लाटण्यासाठी व्हॉट्स अॅप ग्रुपवर जोरदार जाहिरात बाजी सुरु आहे.
जाता जाता -
गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी गेल्या महिनाभरात झटापट पूर्ण झाल्यामुळे, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, प्रवाशी मित्रांनी यावर समाधानी न होता, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन, मुंबई-भुसावळ पँसेजर, नाशिक -भुसावळ पँसेजर या गाड्यांना जादा डबे जोडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच हुतात्माची पुण्याला जाण्यासाठी रात्रीची १२ ची वेळ असल्यामुळे, अनेक प्रवाशांना त्रास होत असून,या गाडीची वेळ बदलणे गरजेचे आहे. तसेच चाकरमान्यासांठीदेखील मनमाड ते भुसावळ दरम्यान स्वतंत्र गाडी सुरु करणे गरजेचे आहे.