संविधानाचा आदर करा- डॉ.एल.ए.पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 04:15 PM2019-12-01T16:15:57+5:302019-12-01T16:17:15+5:30
संविधान हाच आपला धर्म असून त्याचा आदर करा. नागरिकांनी कर्तव्ये समजून घ्यावी. चांगल्या बाजूने उभे राहणे हे विचारी माणसांचे काम आहे. जात निघाली की धर्म निघेल. मग मानव जन्म सुसह्य होईल, असे मत प्राचार्य डॉ.एल.ए.पाटील यांनी केले.
अमळनेर, जि.जळगाव : संविधान हाच आपला धर्म असून त्याचा आदर करा. नागरिकांनी कर्तव्ये समजून घ्यावी. चांगल्या बाजूने उभे राहणे हे विचारी माणसांचे काम आहे. जात निघाली की धर्म निघेल. मग मानव जन्म सुसह्य होईल, असे मत नॅनोशास्त्रज्ञ तथा प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ.एल.ए.पाटील यांनी केले.
शिवशाही फाऊंडेशनतर्फे आयोजित व्याख्यानात ते ‘भारतीय संविधानाचे योगदान’ या विषयावर बोलत होते. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ अध्यक्षस्थानी होते.
शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिºहाडे, प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एस.ओ.माळी, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. देशमुख, विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे प्राचार्य एस. यू. पाटील, शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी २६/११ च्या हल्ल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले. यावेळी उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय सोनवणे (पिंगळवाडे), सहायक शिक्षिका दर्शना चौधरी (शिरुड), साने गुरुजी माध्यमिक पतसंस्थेच्या नूतन अध्यक्षा सुलोचना पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला.
डॉ.पाटील पुढे म्हणाले, की काही राजकीय लोक स्वातंत्र्य, समता यांचा विचार करत नाहीत. शिक्षणाने आम्ही खोटं बोलायला शिकलो आहोत. सगळ्या संवेदना, व्यथा समजून देऊन राज्य घटनेचे लिखाण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. सेवा, त्याग, चारित्र्य आहे म्हणून कीर्ती आहे. जग हे समूहाकडून व्यक्तीकडे चालले आहे. घटना दांडगाई करणाऱ्यांपर्यंत अजून पोहचलेली नाही. कोणत्याही लग्नपत्रिकेत राजकीय व्यक्तींना अगोदर स्थान असते. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना महत्त्व दिले जाते, ही बाब चुकीची आहे. यात आवश्यक वेळी बदल झाला तरच खºया अर्थाने देशाचा विकास होईल. मॅनेज केलेली कोणतीही गोष्ट टिकाऊ नसते. सत्य हे नेहमीच सत्य असते. हक्कांचा जन्म कर्तव्यातून होतो. यासाठी प्रत्येक नागरिकाने सामाजिक व शैक्षणिक तंदुरुस्तीसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तहसीलदार वाघ म्हणाले, की जगातील सर्व लोकशाहीचा अभ्यास करून डॉ.बाबासाहेबांनी सर्व मूलभूत गोष्टींचा समावेश भारतीय संविधानामध्ये केला. आज आपण मूलभूत हक्कांची मागणी करतो. मात्र, त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यांचीही जाणीव प्रत्येक भारतीयांनी केली पाहिजे तरच देशाचा सर्वांगीण विकास होईल.
व्ही. डी. पाटील यांनी संविधान वाचन केले. विशाल देशमुख यांनी परिचय करून दिला. डी.ए.धनगर यांनी प्रास्ताविक केले. निरंजन पेंढारे यांनी सूत्रसंचालन केले. उमेश काटे यांनी आभार मानले.
यावेळी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.