कलेच्या रंगात रंगला बहिणाबार्इंचा जीवनपट, नशिराबाद येथे राज्य चित्रकला शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:44 PM2018-05-07T12:44:18+5:302018-05-07T12:44:18+5:30
राज्यातील २० चित्रकारांचा सहभाग
प्रसाद धर्माधिकारी / आॅनलाइन लोकमत
नशिराबाद, जि. जळगाव, दि. ७ - : राज्यस्तरीय चित्रकला शिबिरात निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जीवनपट चित्रकारांनी आपल्या कुंचल्यातून विविध रंगाचा आविष्कार सादर करून बहिणाबार्इंना अभिवादन केले.
नशिराबादच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्य चित्रकला शिबिरात सर्वच रंगाच्या रंगविश्वात रंगून गेले होते. कलेच्या माध्यमातून प्रत्येक कलाकार रंगछटा उमटवित होते. कलाविष्कार पाहण्यासाठी जिल्हावासी गर्दी करीत आहेत.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ असा ऐतिहासिक नामकरणाचा निर्णय झाला आहे, त्यानिमित्त अजिंठारेषेचे धनी कलाशिक्षक स्व.पी.जी.कुमावत यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय चित्रकला शिबिर घेण्यात येत आहे.
राज्यातील २० चित्रकार सहभागी
चार दिवस हे शिबिर होणार आहे. त्यात राज्यातील चित्रकार विविध रंगछटांच्या माध्यमातून कवयित्री बहिणाबार्इंच्या कार्याचा जीवनपट रंगवित आहे. त्यात राज्यातील सुमारे २० चित्रकार सहभागी झाले आहेत.
शिबिराचे उद्घाटन मालतीकांत पुरुषोत्तम नारखेडे यांच्या हस्ते दीप प्रज्वालनाने झाले.
यावेळी प्रताप कुमावत, जि.प.सदस्य लालचंद पाटील, सरपंच विकास पाटील, प्राचार्य राजेंद्र महाजन, इच्छाराम नाईक, कलावंत रघु नेवरे (नागपूर), माजी सरपंच पंकज महाजन, किशोर पाटील, शाम कुमावत, सहायक सरकारी वकील मोहन देशपांडे, डॉ.प्रमोद आमोदकर, सुरेश अकोले आदींच्या हस्ते नटराज पूजन झाले. शिबिर घेण्याबाबतचा उद्देश शाम कुमावत यांनी व्यक्त केला.
नशिराबादसारख्या ग्रामीण भागात प्रथमच होत असलेल्या या राज्यस्तरीय शिबिरास प्रतिसाद मिळत असून राज्यातील विविध भागातील चित्रकार ग्रामीण भागात होत असलेल्या या शिबिरात सहभागी झाले आहेत.
पुरातन नाईकवाड्यात होतेय शिबिर
नाईक वाड्यात सुमारे दोन शतकाच्या पुरातन लाकडी इमारतीत हे शिबिर भरविण्यात आले आहे. त्यामुळे शिबिरास वेगळेपण प्राप्त झाले असून पुरातन काळाच्या स्मृतींना उजाळा मिळाला आहे.
या चित्रकारांचा सहभाग
नाईक वाड्यात होत असलेल्या राष्ट्रीय चित्रकला शिबिरात चित्रकार रघु नेवरे (नागपूर), अमित काला (जयपूर), राजेश पाटील (इंदौर), वंदना परगनिया (नागपूर), राजेंद्र महाजन (चोपडा), विरेन आनंद (नागपूर), अरविंद बडगुजर (भुसावळ), मिलिंद विचारे (जळगाव), राजू बाविस्कर (जळगाव), जितेंद्र सुरळकर (पीसुर्वो) मुंबई, विकास मल्हारा (जळगाव), शाम कुमावत (नशिराबाद), विजय जैन (जळगाव), मनोज जंजाळकर (जळगाव), हारुन पटेल (जळगाव), प्रताप कुमावत (नशिराबाद), निरंजन शेलार (जळगाव), सचिन मुसळे, योगेश सुतार (जळगाव) हे चित्रकार शिबिरात सहभागी झाले आहेत.
मी मॉडर्न आर्टिस्ट आहे. कवयित्री बहिणाबार्इंचा जीवनपट कलेच्या माध्यमातून मांडण्याची संधी मिळाली. आतापर्यंत देशात व परदेशातील ९ ठिकाणी चित्र रेखाटले आहे. नशिराबादच्या जुने नावानुसार १६ दरवाजे व बहिणाबार्इंची चित्र काढले आहे. -जितेंद्र सुरळकर (पीसुर्वो)
जयपूरचे महत्व अगाध असले तरी कला एक सारखी नाही. बहिणाबार्इंच्या कवितेतून रंगछटा मांडण्याचा प्रयत्न आहे. कला हीच कविता व स्पंदन आहे. कला ही चैतन्यदायी आहे.
-अमित काला, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त
आधुनिकतेमुळे माणूसकी तुटत असली तरी ती कलेच्या माध्यमातून जिवंत आहे. आजपर्यंत मी चित्र रेखाटण्यात विदेशी रंगच वापरले. भारतीय रंगात दर्जा नसल्याची खंत आहे. -रघु नेवरे, नागपूर
माणसाला माणूसपण मिळावे या उद्देशातून चित्र रेखाटत आहे. बहिणाबार्इंचे योगदान मोठे आहे. कलेतून त्यांना अभिवादन करीत आहे.
-प्रा.राजेंद्र महाजन, चोपडा
नैसर्गिक रंगाला अनन्य महत्व आहे. त्यामुळे कलेला जिवंतपणा मिळतो. चित्र काढण्याचे माध्यम बदलले मात्र कला तीच आहे. -हरुण पटेल, जळगाव
लहानपणापासून कलेचे बाळकडू मिळाले. गावाचा लौकीक देशभरात व्हावा व कलेचा प्रसार होण्यासाठी शिबिर होत आहे. घराण्याचा वारसा अबाधित रहावा या उद्देशाने वडिलांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय शिबिर घेतले आहे. राज्यातील कलाकारांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसादाने हे शिबिर सार्थकी झाले आहे. -शाम कुमावत, नशिराबाद कलाशिक्षक व आयोजक