घर खरेदीला प्रतिसाद; वाहन विक्री ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:15 AM2021-05-15T04:15:25+5:302021-05-15T04:15:25+5:30
जळगाव : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घर खरेदीला प्रतिसाद मिळाला, मात्र दुसरीकडे वाहन विक्री, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने बंद ...
जळगाव : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घर खरेदीला प्रतिसाद मिळाला, मात्र दुसरीकडे वाहन विक्री, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने बंद असल्याने त्यांची विक्री होऊ शकली नाही. ऐन मुहूर्तावर व्यवहार ठप्प झाल्याने सुमारे ४५ ते ५० कोटी रुपयांची उलाढाल थांबल्याचे जाणकारांनी सांगितले.
अक्षय्य तृतीयेला केलेली खरेदी अक्षय असते, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी विविध वस्तूंच्या खरेदीला ग्राहक पसंती देतात. त्यात सुवर्ण व जमीन-जुमला खरेदीला अधिक महत्त्व असते. बँका व पतपेढ्या आणि खासगी वित्तसंस्थांकडून कमी टक्के व्याजाने आणि कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे होणारा कर्ज पुरवठा यामुळे घर खरेदीला पसंती दिली जात आहे. कोरोनाचा संसर्ग असला तरी या काळात स्वतःच्या घराचे महत्त्व अधिक वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून घर खरेदीला प्रतिसाद वाढत आहे. त्यात अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त असल्याने या दिवशी जळगाव शहरात जवळपास शंभर ते सव्वाशे जणांनी घरांचे बुकिंग केले आहे.
वाहन बाजार थांबला
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कार बाजारात उत्साह असतो. या दिवशी जवळपास दीडशे ते दोनशे चारचाकींची विक्री होत असते. मात्र यंदा निर्बंधामुळे वाहन विक्री बंद आहे. तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणीदेखील होत नसल्याने वाहनांची विक्री थांबली आहे. यामध्ये दुचाकींचीदेखील अशीच स्थिती आहे.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पडून
या दिवसांत उन्हाची तीव्रता वाढते. त्यामुळे नागरिकांचा एसीकडे कल वाढतो. परिणामी गुढीपाडवा व अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर एसीसह फ्रीज, वॉशिंग मशीन, एलईडी यांची खरेदी केली जाते. मात्र निर्बंधांमुळे यंदा गुढीपाडव्यापाठोपाठ आता अक्षय्य तृतीयेलादेखील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची उलाढाल ठप्प आहे.
---------------
घर खरेदीकडे अनेकांचा कल वाढला आहे. नवीन घरांमध्ये वाढत्या व दर्जेदार सुविधांमुळे ग्राहक आकर्षित होत आहेत. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चांगला प्रतिसाद राहिला.
- सपन झुनझुनवाला, बांधकाम व्यावसायिक
चारचाकी वाहन बाजारात अक्षय्य तृतीयेला गाड्यांची चांगली विक्री होते. मात्र यंदा निर्बंधामुळे वाहन विक्री थांबली आहे.
- उज्ज्वला खर्चे, विक्री व्यवस्थापक
दुचाकी विक्रीला चांगला प्रतिसाद असतो. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधण्यासाठी अनेक जण सकाळपासूनच गर्दी करतात. मात्र यंदा दुकाने बंद असल्याने दुचाकी विक्री होऊ शकली नाही.
-अमित तिवारी, महाव्यवस्थापक