यंत्रणांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 09:11 PM2021-01-14T21:11:29+5:302021-01-14T21:11:29+5:30
जिल्हाधिकारी : प्रजासत्ताक दिन पूर्वतयारी आढावा बैठक
जळगाव - प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदानावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. या समारंभासाठी सर्व संबंधित यंत्रणांवर सोपविलेली जबाबदारी सर्वांनी चोखपणे पार पाडावी, अशा सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.
प्रजासत्ताक दिन समारंभाची पूर्वतयारी आढावा बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, प्रसाद मते, सुनील सुर्यवंशी, योगेश पाटील, मिलींद दिक्षित, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, विजयसिंग परदेशी, सुरेश थोरात, संतोष सोनवणे आदींची उपस्थिती होती.
समारंभास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक असून संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर राखून पार पाडला जाईल याची कटाक्षाने काळजी घ्यावी. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने विविध स्पर्धाचे, वृक्षारोपण, प्रश्नमंजुषा स्पर्धा, वेबिनारचे आयोजन करावे. मात्र प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध खेळांचे आयोजन करण्यात येवू नये. यादिवशी सकाळी ८.३० ते १० वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये, अशा, सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या. एखाद्या संस्थेला अथवा कार्यालयाला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी सकाळी ८.३० वाजेपूर्वी किंवा १० वाजेनंतर करावा. मुख्य शासकीय समारंभ नीटनेटका होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडेल याची दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी राऊत यांनी बैठकीत दिल्या.