मनपा कोविड केअर केंद्रासाठी अधिकाऱ्यांकडे जबाबदारी निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:16 AM2021-03-14T04:16:34+5:302021-03-14T04:16:34+5:30
जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे आता मनपाच्या कोविड केअर केंद्राची जबाबदारी प्रमुख ...
जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे आता मनपाच्या कोविड केअर केंद्राची जबाबदारी प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांसह मनपाच्या वरिष्ठ
अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. याबाबत शनिवारी मनपा आयुक्त सतीष कुळकर्णी यांनी पत्र काढले आहे.
महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार, कोविड केअर केंद्राचे काम प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलाणी, शहर अभियंता अरविंद भोसले, पाणीपुरवठा अभियंता सुशीलकुमार साळुंखे, सहायक आयुक्त पवन पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, भांडारपाल दीनानाथ भामरे, १ ते ४ प्रभाग अधिकारी, विद्युत विभागप्रमुख एस. एस. पाटील, वाहन विभागप्रमुख गोपाल लुले यांच्याकडे सोपविले आहे. दरम्यान, दैनंदिन कामाचा अहवालही अधिकाऱ्यांना द्यावा लागणार आहे. तसेच नियंत्रण अधिकारी म्हणून उपायुक्त शाम गोसावी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
अशी आहे जबाबदारी
- प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे कोविड केअर केंद्रातील उपलब्ध बेडची संख्या व किती बेड आवश्यक आहेत, त्याबाबतचा सविस्तर मागणी अहवाल उपायुक्तांना पाठविण्याची जबाबदारी आहे.
- शहर अभियंता यांच्याकडे उपलब्ध बेड संख्येचा आढावा घेऊन नवीन इमारत अधिग्रहण करणे तसेच त्याठिकाणी पलंग आदी स्थापत्यविषयक बाबींची विहित पद्धतीचा अवलंब करून प्राधान्याने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे.
- पाणीपुरवठा विभाग अभियंता यांच्याकडे केंद्रातील पाणीपुरवठासंबंधी बाबींचा सविस्तर आढावा घेऊन उपायुक्त यांनी केलेल्या सूचनेनुसार अधिगृहीत इमारतींमध्ये पाणीपुरवठासंबंधी बाबींची प्राधान्याने पूर्तता करण्याची जबाबदारी सोपविली.
- सहायक आयुक्त यांच्याकडे कोविड केअर केंद्रातील दैनंदिन साफसफाईचा आढावा घेणे, तसेच मलेरिया विभागास फवारणीसाठी त्वरित कर्मचारी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी दिली आहे.
- आरोग्य अधिकारी यांच्याकडे दैनंदिन प्राप्त अहवालानुसार सक्रिय रुग्ण संख्येचे विवरण, तपासणी करून प्रभागनिहाय नियोजन करण्याचे व त्यानंतर प्रत्येक सक्रिय रुग्णाच्या घरात तसेच आजूबाजूच्या परिसरात फवारणी करून घेण्याची जबाबदारी सोपविली आहे.
- भांडारपाल यांच्याकडे कोविड केअर केंद्र, कंटेन्टमेंट झोन, नवीन अधिग्रहण होणाऱ्या इमारतीसाठी आवश्यक साधनसामग्री संबंधित मागणीप्रमाणे अवलंब करून पुरवठा करण्याची जबाबदारी आहे.
- प्रभाग अधिकारी यांच्याकडे कंटेन्टमेंट झोन घोषित करणे, त्याअनुषंगाने सभोवतालचा परिसर सील करणे तसेच सक्रिय रुग्ण असणाऱ्या प्रत्येक घरावर बोर्ड प्रदर्शित करण्याची जबाबदारी आहे.
- विद्युत विभागप्रमुख यांच्याकडे केंद्रामधील विद्युत यंत्रणेसंबंधी आढावा घेणे व नवीन अधिगृहीत इमारतीमध्ये विद्युत यंत्रणेसंबंधी बाबींची प्राधान्याने पूर्तता करण्याची जबाबदारी सोपविली आहे.
- वाहन विभागप्रमुख यांच्याकडे उपायुक्त यांच्या केलेल्या सूचनेनुसार संबंधितांच्या मागणीनुसार वाहन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपविली.