‘रणरागिनीं’च्या हाती बसेस दुरुस्तीची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 12:22 PM2020-03-08T12:22:45+5:302020-03-08T12:23:19+5:30

पुरुष कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने करतात अवघड काम

The responsibility of repairing buses in the hands of 'Ranagarin' | ‘रणरागिनीं’च्या हाती बसेस दुरुस्तीची जबाबदारी

‘रणरागिनीं’च्या हाती बसेस दुरुस्तीची जबाबदारी

googlenewsNext

सचिन देव
जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून पुरुष कर्मचाऱ्यांकडे असलेली एस. टी. बसेसच्या दुरुस्ती जबाबदारी,आता महिला कर्मचाºयांकडेदेखील आली आहे. अवजड अशा बसेसची स्वत : संपुर्ण दुरुस्ती करुन, या महिला लालपरीला रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज आहेत. काम करतांना त्यांची चिकाटी, हिंमत आणि उत्साह सर्वांना प्रेरणा देत आहे.
एकेकाळी सर्वच क्षेत्रात असलेली पुरुषांची मक्तेदारी २१ व्या शतकातील सावित्रीच्या लेकींनी मोडून काढली आहे. प्रत्येक आव्हानात्मक क्षेत्रात महिलांनी प्रवेश केल्यानंतर, एस. टी. महामंडळ हे क्षेत्रदेखील मागे राहिलेली नाही. विशेष म्हणजे अत्यंत अवघड व जबाबदारीचे काम असलेल्या जळगाव आगाराच्या यांत्रिक कार्यशाळेतील बसेसची दुरुस्ती पुरुषांप्रमाणे महिलांच्या हाती आली आहे. लालपरीच्या दुरुस्तीचे कुठलेही काम असो किंवा रस्त्यावर बंद पडलेली बस पुन्हा दुरुस्ती करायचे काम असो, हे सर्व आव्हानात्मक काम या ‘रणरागिनी ’लिलाया पार पाडत आहेत.
आव्हानात्मक कामाचा वेगळाच आनंद
कार्यशाळेत सहायक मेकॅनिकलची मनिषा बडगुजर, सिमा पाटील, कविता बारी यांच्याकडे जबाबदारी असून, पुष्पा अहिरे व वंदना बिºहाडे यांच्याकडे इलेक्ट्रीशियनची जबाबदारी आहे. इयत्ता १० वी नंतर आयटीआय करुन या महिला २०१३ पासून झालेल्या भरती प्रक्रियेच्या माध्यमातुन आगारात भरती झाल्या आहेत. कार्यशाळेत या महिलांना पुरुष कर्मचाºयांप्रमाणे इंजिनची दुरुस्ती व इतर तांत्रिक काम करावे लागते. अनेकवेळा बस दुरुस्त करतांना, या महिलांची कसोटीच असते. बसेस दुरुस्तीवेळी वेगवेगळ््या ‘स्पेअर पार्ट’ची दुरुस्ती करतांना हे काम खुप अवघड वाटते. मात्र, पुरुषांच्या बरोबरीने हे आव्हानात्मक काम करतांना, आपल्याला काम केल्याचा एक वेगळाच आनंद मिळत असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले.
पहाटे चारपासून सुरु होते दिनचर्या
नोकरीसोबतच कुटुंबाचीदेखील जबाबदारी असल्याने, या रणरागिणींंची दिवसाची सुरुवात पहाटे चारपासूनचं होते. सकाळी साडेसातला कामावर हजर व्हायचे असल्याने, स्वयंपाक, धुणी-भांडी, मुलांच्या शाळेच्या तयारी, सासू-सासºयाची सेवा, पतीचा डबा व त्यानंतर स्वत:ची तयारी करण्यासाठी पहाटे चारलाच उठावे लागत असल्याचे या महिलांनी सांगितले. वर्षांतील दसरा असो किंवा दिवाळी बहुतांश सण -उत्सव हे कामावरचं जात असतात, असे त्या सांगतात.
दसरा, दिवाळीसारखा आनंद
आम्हाला हे काम खरोखरच आव्हानात्मक वाटते. आजपर्यंत हे काम म्हणजे पुरुषांची मक्तेदारी होती अन् आता या कामात आम्हीही पुढे आहोत, हे आम्ही सिध्द केले आहे. या कामाच्या आनंदातून आम्हाला दररोज दसरा आणि दिवाळीसारखा आनंद मिळत आहे. आम्ही सर्व महिला एकत्रितपणे काम करत असल्याने ‘एन्जॉय’ करतच आमचे काम चालते. पहिले हे काम करताना थोडा त्रास जाणवला, पण आता हे काम अंगवळणी पडल्याचे या महिलांनी सांगितले.

Web Title: The responsibility of repairing buses in the hands of 'Ranagarin'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव