जळगावात मजीप्राच्या मंडळ कार्यालयाची पुर्नस्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:51+5:302021-07-19T04:12:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (मजीप्रा) मंडळ कार्यालय जळगाव येथे पुन्हा सुरू करण्यात येणार असून सोमवार, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (मजीप्रा) मंडळ कार्यालय जळगाव येथे पुन्हा सुरू करण्यात येणार असून सोमवार, १९ जुलै रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते त्याचे उदघाटन होणार आहे. या कार्यालयामुळे योजनांसाठीचा पाठपुरावा सुलभ होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मंडळ कार्यालय २००८ मध्ये बंद करण्यात येऊन नाशिक येथे स्थलांतरीत करण्यात आले. मात्र अलीकडच्या काळात केंद्र, राज्य सरकारचे जलजीवन मिशनच्या माध्यमातून कामे होणार असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावरील कामाचा भार अजून वाढला आहे. तसेच ७५ लाखांवरील पाणी पुरवठा योजनांसाठी नाशिक येथील मंडळ कार्यालयातील अधीक्षक अभियंत्यांची परवानगी लागत असल्याने याचा पाठपुरावा करण्यासाठी अडचणी येत होत्या. या अनुषंगाने जळगावात मजीप्राचे मंडळ कार्यालय व्हावे यासाठी गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा सुरू केला.
त्यानुसार प्राधिकरणाचे मंडळ कार्यालय जळगावात सुरू करण्यात येणार असून त्याचे उद्घाटन आकाशवाणी केंद्रामागे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय येथे सोमवार, १९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता गुलाबराव पाटील यांच्याहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर हे राहणार असून विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांच्यासह विविध मान्यवर या उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (नाशिक) मुख्य अभियंता प्रशांत भामरे आणि जळगाव कार्यालयाचे अधीक्षक अभियंता शिवशंकर निकम यांनी केले आहे.