फटाक्यांसह आवाजावरही निर्बंध
By admin | Published: October 28, 2016 12:15 AM2016-10-28T00:15:46+5:302016-10-28T00:15:46+5:30
फटाके विक्री व साठवणुकीवर बंधने घातली गेली आहेत. त्याबरोबर फटाक्यांच्या आवाजावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
अमरावती : फटाके विक्री व साठवणुकीवर बंधने घातली गेली आहेत. त्याबरोबर फटाक्यांच्या आवाजावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाने ध्वनीप्रदूषणाबाबत दंडक घालून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षा आणि दंडाचे प्रावधान करण्यात आले आहे.
पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत मिळालेल्या अधिकारानुसार केंद्र शासनाने ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) २००० बनविला आहे. ध्वनीप्रदूषण नियम २००० अन्वये नियम ५ मध्ये ध्वनीक्षेपक, राज्य आणि आवाज निर्माण करणारे कोणतेही यंत्र यांचा सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी वापर करण्यास बंधन घातले आहे. तसेच नियम ५ अ अंतर्गत शांतता क्षेत्रात ध्वनीक्षेपक, फटाके, वाद्य इत्यादी वापरण्यास मनाई केली आहे. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी आदेश काढले आहेत.
निवासी क्षेत्रात ५५ डेसिबल, व्यापारी क्षेत्रात ६५ डेसिबल व औद्योगिक क्षेत्रात ७५ डेसिबल इतकी ध्वनीची मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी कोणतेही वाद्य, ध्वनीक्षेपक वाजवण्यास मनाई केली आहे. ध्वनीप्रदूषण नियम व नियंत्रण २००० च्या नियम ५ (३) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर श्रोतृगृह, सभागृहे, सामूहिक सभागृह, मेजवानी कक्ष यासारख्या बंंद जागेखेरीजइतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत करण्यात येईल. दिवाळीतील लक्ष्मीपुजनाचा दिवस, ख्रिसमस व ३१ डिसेंबर या प्रत्येकी १ दिवस अशा तीन दिवशी ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धकाचा वापर अनुज्ञेय राहणार आहे.
पाच वर्षे शिक्षा
ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यक्तीविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम १५ अन्वये गुन्हा दाखल केल्या जावू शकतो. या गुन्ह्यात ५ वर्षे शिक्षा व १ लाख रुपयांची दंडाची तरतूद आहे. (प्रतिनिधी)