निर्बंधामुळे ग्राहकी कमी, किराणा साहित्याचे भाव स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:33+5:302021-07-05T04:12:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या खाद्यतेलाच्या भावात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण होऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या खाद्यतेलाच्या भावात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण होऊन सर्वच प्रकारच्या तेलाचे भाव १० रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. डेल्टा विषाणूच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंध काळात दुकानांना वेळेचे बंधन आल्याने ग्राहकी कमी झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून खाद्य तेलाच्या भावात सातत्याने वाढ होत जाऊन तेलाने उच्चांकी गाठली होती. मात्र गेल्या आठवड्यापाठोपाठ आता याही आठवड्यात खाद्यतेलात १० रुपये प्रति किलोने घसरण झाली आहे. यामध्ये सोयाबीन तेल १४०, शेंगदाणा तेल- १६५, सूर्यफूल तेल १५०, पाम तेल १२० रुपये प्रति किलोवर आले आहे. तीळ तेल मात्र २०० रुपये प्रति किलोवर कायम आहे. तेलाचे भाव कमी होण्यासह इतर किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहे.
निर्बंधाचा परिणाम
जिल्ह्यात डेल्टा विषाणूचे रुग्ण आढळून आल्यानंतर निर्बंध लागू करीत दुकानांना दुपारी ४ वाजेपर्यंतच परवानगी असल्याने ग्राहकी कमी झाली आहे. यामुळे मागणीवरही परिणाम होऊन सर्वच किराणा मालाचे भाव स्थिर आहेत. बेसनपीठ ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर कायम आहे. साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहे.
टमाटे वधारले
पावसाळा सुरू झाल्यानंतर टमाट्याचे भाव वाढत असून ते आता ३० ते ३५ रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. हिरवी मिरची ४० रुपये प्रति किलो आहे. तसेच कोथिंबीर ४० रुपये प्रति किलो, मेथी ५० रुपये किलोवर आहे.
पावसाचा कांद्यावर परिणाम
बटाट्याचे भाव २० रुपये प्रति किलोवर आहेत. मात्र दुसरीकडे कांद्याचे भाव अजूनही वाढलेलेच आहे. पाऊस झाल्याने कांद्यावर परिणाम होऊन कांद्याचे आवरण काळे पडू लागले आहे. सध्या कांदा ३५ रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. लसुण १०० ते १४० रुपये तर लिंबू ६० रुपये प्रति किलोवर कायम आहे.
सध्या सर्वच किराणा साहित्याचे भाव स्थिर असल्याने तसेच खाद्यतेलाचे भाव आणखी कमी झाल्याने दिलासा आहे. भाजीपाल्यात काहीसी तेजी येत असल्याने भार वाढत आहे.
- रमेश बाविस्कर, ग्राहक
या आठवड्यातही खाद्यतेलाचे भाव कमी झाले आहे. इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे.
- सचिन छाजेड, व्यापारी
सध्या पावसाळ्यामुळे कांद्याचे भाव वाढत आहे. पालेभाज्याचे भाव वाढत आहे. टमाट्याचे भाव अधिक वाढले आहे.
- रामकृष्ण पाटील, भाजीपाला विक्रेते