मेडिकलवर रेमडेसिविरच्या विक्रीला निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:15 AM2021-04-15T04:15:19+5:302021-04-15T04:15:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा प्रशासनाने कोविड संदर्भात बुधवारी नवे आदेश पारित केले आहेत. त्यात कोविड रुग्णालयाने रुग्णाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा प्रशासनाने कोविड संदर्भात बुधवारी नवे आदेश पारित केले आहेत. त्यात कोविड रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिविर प्रिस्क्रिपशन देण्याऐवजी आपल्याशी संलग्न असलेल्या मेडिकल शॉपमधून थेट वायल्स घेऊन रुग्णास द्यावे आणि त्या औषधाचे बिल हे रुग्णाच्या शेवटच्या बिलात समाविष्ट करावे, कोविड रुग्णालयाशी संलग्न असलेल्या मेडिकलने काऊंटरवर त्याची विक्री करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बुधवारी दिले आहेत.
या आदेशात म्हटले आहे. की, रुग्णालयाने जेवढे वायल्स संलग्न मेडिकल शॉपमध्ये उपलब्ध आहेत. त्याचा योग्य वापर करावा. शासनाने निश्चित केलेल्या सहपत्रात भरून त्याच्या दोन प्रती सांभाळून ठेवाव्या. तसेच प्रत्येक रुग्णाच्या रिकाम्या वायल्स जपून ठेवाव्या. मेडिकलमधील वायल्सची रुग्णांच्या तुलनेत संख्या कमी असेल तर अन्न आणि औषध प्रशासनाशी संपर्क साधावा.
कोविड रुग्णालयाने रुग्णांना औषधाची किंमतही शासनमान्य दरानेच करावी. काही कारणाने रेमडेसिविर इंजेक्शनचा डोस पूर्ण दिला गेला नाही तर उर्वरित साठा मेडिकल स्टोअर्सला परत करावा.
या आदेशात म्हटले आहे की, रुग्णालयांनी कोविड रुग्णालय सुरू करण्याच्या आधी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे कोविड हॉस्पिटल म्हणून नोंदणी करावी. तसेच त्याची माहिती दररोज जळगाव जिल्ह्याच्या डॅशबोर्डवर भरावी. रेमडेसिविरची मागणी ही तीन दिवस पुरेल एवढीच करावी. घाऊक औषध विक्रेत्यांनी सी ॲण्ड एफ एजंट यांनी कागदपत्रे शहानिशा केल्यानंतरच संबंधित रुग्णालयाच्या मागणी प्रमाणे औषध पुरवठा करावा. ज्या रुग्णालयांना संलग्न मेडिकल नाही. त्यांनी रेमडेसिविरची खरेदी ही घाऊक औषध विक्रेते यांच्याकडून करावी. असे आदेश देण्यात आले आहेत.