लग्न समारंभ, बाजारात गर्दीवर निर्बंध घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:21 AM2021-02-17T04:21:41+5:302021-02-17T04:21:41+5:30

व्यापारी, हॉटेल व्यावसायीकांची आज मनपात बैठक : शहरात प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करा ; महापौरांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क ...

Restrictions on wedding ceremonies, market crowds | लग्न समारंभ, बाजारात गर्दीवर निर्बंध घाला

लग्न समारंभ, बाजारात गर्दीवर निर्बंध घाला

Next

व्यापारी, हॉटेल व्यावसायीकांची आज मनपात बैठक : शहरात प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करा ; महापौरांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - जिल्ह्यासह शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणेकडून उपाययोजनांसाठी बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. शहरात होणारे लग्न समारंभ, बाजारातील गर्दी, हॉटेल व रेस्ट्रँमध्ये होणाऱ्या गर्दीवर कडक निर्बंध घालण्याचा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बाजारात किंवा सार्वत्रिक ठिकाणावर शासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा सूचनाही महापौरांनी दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापौर भारती सोनवणे यांनी आपल्या दालनात मनपा वैद्यकीय , आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, उपायुक्त शाम गोसावी, नगरसेवक कैलास सोनवणे, मनपा प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी यांच्यासह मनपाचे इतर डॉक्टर उपस्थित होते. शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असून लग्न समारंभ, आठवडे बाजार, बाजार समिती, गर्दीच्या ठिकाणी नागरिकांकडून शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाला वेळीच अटकाव घालून दुसरी लाट रोखण्यासाठी गर्दीचे कार्यक्रम आणि ठिकाणी मनपाचे पथक लक्ष ठेवणार असून नियम मोडल्यास कारवाई करण्याच्या सूचना महापौरांनी या बैठकीत दिल्या.

महापौरांनी दिल्या सूचना

१. संशयित रुग्णांची दररोज कोरोना चाचणी केली जात असून मुबलक प्रमाणात आरटीपीसीआर किट आणि अँटीजन टेस्ट किट उपलब्ध ठेवा.

२. शहरात रुग्ण वाढत असल्याचे लक्षात येत असल्याने पुन्हा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच, याबाबत प्रस्ताव तयार करून आयुक्तांकडे पाठवावा अशा सूचनामहापौरांनी केल्या.

३. सद्यस्थितीत डेग्यू, मलेरिया यासह साथीचे रुग्ण आढळून येत आहे. आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच शहरवासियांचे आरोग्य अबाधित ठेवणेसाठी डेग्यु, मलेरिया व इतर आजारांच्या प्रतिबंध करणेसाठी शहरात फॉगिग, स्प्रेयींगसह तत्सम कार्यवाही करण्याचा सूचना महापौरांनी दिल्या.

४. शासनाने लग्न समारंभ, मेळावे, बाजारातील गर्दीबाबत काही नियम आखून दिले आहेत. त्या नियमांची कडक अंमलबजावणी करून, नियम मोडणाऱ्यांना कडक दंड करा.

शहरात प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करावा

शहरातील कोरोना रुग्णांची दररोज वाढत आहेत. नागरीकांनी मास्क लावावा, फिजीकल डिस्टन्सचे पालन करावे, कोणत्याही ठिकाणी गर्दी होवु नये यासाठी दक्षता घ्यावी म्हणून आपण आपल्या अधिकारांचा वापर करीत जळगाव शहरात प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करावे, अशी विनंती महापौर भारती सोनवणे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

व्यापाऱ्यांची मनपात बैठक

मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी कोरोनाच्या उपाययोजनांबाबत बुधवारी ४ वाजता मनपात शहरातील विविध मार्केट असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी संघटना, हॉटेल व्यावसायिक, मंगल कार्यालयाचे मालकांची बैठक बोलाविले आहे. या बैठकीत आयुक्तांकडून काही मार्गदर्शक सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे याबाबत देखील मनपाकडून कडक अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Restrictions on wedding ceremonies, market crowds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.