महाजनादेश यात्रेची फलश्रृती : अनेकांना उमेदवारीचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 01:32 AM2019-08-25T01:32:06+5:302019-08-25T01:33:01+5:30
चुडामण बोरसे जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांना ...
चुडामण बोरसे
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांना उमेदवारी मिळण्याचे संकेत तर मिळालेच शिवाय काही जणांना संभ्रमातही टाकले आहे.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दोन दिवस जिल्ह्यात होती. यात अमळनेर, पारोळा, जळगाव, भुसावळ, जामनेर आणि बोदवड येथील सभा आणि स्वागतप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला महाजनादेश आहे काय असा प्रश्न करीत जनतेकडूनच उत्तर घेतले. मध्यंतरीच्या काळात तर भाजपच्या आमदारांचे तिकिट कायम ठेवणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. आता आणखी आशिर्वाद आणि महाजनादेश आहे का? अशी विचारणा करीत एकाच दगडात अनेक पक्षीही मारण्याचा प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे.
अमळनेरला आमदार शिरीष चौधरी आणि आमदार स्मिता वाघ या दोघांना आशिर्वाद आहे का? अशी विचारणा केली. या गुपितामधून आपल्यालाच तिकिट मिळेल, अशी आशा दोन्ही आमदारांच्या समर्थकांना नक्कीच असतील. तर दुसरीकडे आमदार चौधरी यांनी वेगळा मार्ग स्वीकारला तर स्मिता वाघ आहेतच, अशीही एक चर्चा रंगू लागली आहे.
पारोळ्यात राष्टÑवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्या विरोधात आता पुतणे करण पवार हे भाजपतर्फे लढणार हे निश्चित झाले आहे. जळगावातही आमदार सुरेश भोळे आणि मला आशिर्वाद द्या असे सांगत फडणवीस यांनी भोळे यांचा मार्ग मोकळा केल्याचे म्हटले जात आहे. अशी विचारणा त्यांनी भुसावळच्या सभेत आमदार संजय सावकारे यांच्यासाठी आणि शनिवारी सकाळी बोदवड येथील स्वागतप्रसंगी खडसे, गिरीश महाजन आणि आपणास आशिर्वाद द्या... अशी हाक देत त्यांनी उपस्थितांनी मने जिंकली. आता ज्यांच्यासाठी विचारणा केली त्यांची तिकिटे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहेत. या महाजनादेश यात्रेत अनेक जण भाजपमध्ये येतील अशी अपेक्षा होती. यात माजी मंत्री गुलाबराव देवकर व पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्याही नावाची चर्चा होती. आता या सर्वांना घ्यायचे म्हटले तर जागा कुठे द्यायची असाही प्रश्न कायम आहे. त्यामुळे युतीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत थांबा असा सल्ला देण्यात आल्याची चर्चा आहे.
जिल्हा बँक सध्या खडसे गटाच्या ताब्यात आहे. तिथे एक विश्वासू सहकारी आणून बँकेवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न गिरीश महाजन गटाकडून सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यासाठी देवकर यांना भाजपात आणण्याची तयारी सुरु झाली असल्याचे सांगितले जात आहे.