६८७ ग्रामपंचायतींचा आज निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:14 AM2021-01-18T04:14:48+5:302021-01-18T04:14:48+5:30
जळगाव : जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतदानमोजणी सोमवार, १८ जानेवारी रोजी होणार असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीची तयारी ...
जळगाव : जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतदानमोजणी सोमवार, १८ जानेवारी रोजी होणार असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणीची वेळ जसजशी जवळ येत आहे तसतशी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यापासून ग्रामीण भागात मोठा उत्साह होता व दिवसेंदिवस निवडणुकीचा रंग चांगलाच चढत गेला. या उत्साहातील गुलालाची उधळण आता सोमवारी होणार असून सर्वच जणांना विजयाची अपेक्षा आहे व त्या प्रमाणे ग्रामीण भागात दावादेखील केला जात आहे.
जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यानंतर माघारीच्या दिवसापर्यंत ९३ ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या होत्या.त्यानंतर जिल्ह्यात शुक्रवार, १५ जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेदरम्यान मतदान झाले. जिल्ह्यात एकूण ७८.११ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानासाठी जिल्हाभरात मोठा उत्साह दिसून आला व महिला मतदारही मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडल्या होत्या.
सोमवारी सर्व चित्र स्पष्ट होणार असून सकाळी १० वाजता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणी केंद्रांवर ग्रामपंचायतींच्या संख्येनुसार टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणी केंद्रांवर पोलीस बंदोबस्त
जिल्ह्यात प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने सर्वच केंद्रांवर पोलीस बंदोबस्त राहणार आहे.