महामंडळातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करा, कामगार संघटनेच्या बैठकीत ठराव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 11:23 PM2023-04-15T23:23:18+5:302023-04-15T23:23:49+5:30
भारतीय कामगार संघटनेची राज्यव्यापी बैठक पत्रकार भवनात झाली. १५ ते २० वर्षापासून राज्यात रोजंदारीने कर्मचारी काम करीत आहेत.
जळगाव : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे तसेच वर्ग ३ व वर्ग ४ च्या नवीन पदांची निर्मीती करुन त्याला मान्यता द्यावी, असे दोन महत्वपूर्ण ठराव शनिवारी जळगावात झालेल्या भारतीय कामगार संघटनेच्या राज्यव्यापी बैठकीत करण्यात आल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय सचिव राजेश सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय कामगार संघटनेची राज्यव्यापी बैठक पत्रकार भवनात झाली. १५ ते २० वर्षापासून राज्यात रोजंदारीने कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना कायम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी अर्थात इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्यासह प्रधान सचिव, महामंडळाचे संचालक यांच्याकडे वारंवार लेखी निवेदने देण्यात आली आहे.
रिक्त व नव्याने निर्माण केलेल्या पदांची बिंदू नामावली करुन त्यानुसार रोजंदारी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हतेनुसर सेवेत कायम केल्यास महामंडळाला अनुभवी कर्मचारी मिळतील, असेही सोनवणे यांचे म्हणणे आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष चेतन नन्नवरे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष जहांगीर खान, महामंडळाचे विभागीय अध्यक्ष राहूल बिऱ्हाडे, अर्जुन मोरे, मोहन बिऱ्हाडे, कपील जाधव, शेनफडू सोनवणे, दीपक सोनवणे व विमल मोरे उपस्थित होते.