पुनर्विचार करा, अन्यथा व्यापार सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:17 AM2021-04-07T04:17:17+5:302021-04-07T04:17:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लॉकडाऊनच्या निर्णयानंतर राज्यभरातील व्यापाऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात असून आता राज्य सरकारने या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लॉकडाऊनच्या निर्णयानंतर राज्यभरातील व्यापाऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात असून आता राज्य सरकारने या विषयी ८ एप्रिलपर्यंत पुनर्विचार करावा, अन्यथा ९ पासून व्यापार सुरू करण्यात येईल, असा ठराव मंगळवारी व्यापाऱ्यांनी केला.
लॉकडाऊनच्या निर्णयाविषयी संताप व्यक्त केला जात असून यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील व्यापार उद्योग जगताची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे मंगळवारी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या प्रमुखांची ऑनलाईन बैठक झाली. चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्यासह विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, वेगवेगळ्या जिल्ह्यातील व्यापारी सहभागी झाले होते. यामध्ये जळगावातून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, कॅटचे उपाध्यक्ष दिलीप गांधी, जिल्हा व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष युसुफ मकरा सहभागी झाले होते. चेंबरने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार चेंबरचे निर्देश आल्यावर जिल्ह्याच्यावतीने आंदोलनविषयी सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल, असे या व्यापाऱ्यांनी सांगितले.
या बैठकीत झालेल्या या ठरावाची प्रत सरकारला पाठवून ८ तारखेला सायंकाळी सहा पर्यंत सरकारकडून अपेक्षित निर्णय न झाल्यास ९ एप्रिल पासून राज्यभरातील सर्व व्यापारी कोरोना प्रतिबंधाच्या सर्व सूचनांचे पालन करून आपापले व्यवसाय सुरू करतील, असा इशारा देण्यात आला असल्याची माहिती जळगावातील पदाधिकाऱ्यांनी दिली.