रशिया-युक्रेन युद्धावर निवृत्त ब्रिगेडिअर अग्रवाल म्हणतात, हे काही जागतिक महायुद्ध नाही !

By अमित महाबळ | Published: March 27, 2023 06:55 PM2023-03-27T18:55:12+5:302023-03-27T18:55:24+5:30

पाश्चात्य देशांनी युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला जागतिक महायुद्ध म्हणणे चुकीचे आहे.

Retired Brigadier Agarwal says on Russia-Ukraine war, this is not a world war! | रशिया-युक्रेन युद्धावर निवृत्त ब्रिगेडिअर अग्रवाल म्हणतात, हे काही जागतिक महायुद्ध नाही !

रशिया-युक्रेन युद्धावर निवृत्त ब्रिगेडिअर अग्रवाल म्हणतात, हे काही जागतिक महायुद्ध नाही !

googlenewsNext

अमित महाबळ

जळगाव : पाश्चात्य देशांनी युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला जागतिक महायुद्ध म्हणणे चुकीचे आहे. ते युरोपचे युद्ध आहे. हे सत्य सर्वांनी समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन ब्रिगेडीअर संजय अग्रवाल यांनी केले. ते ‘लोकमत’शी बोलत होते.

युद्ध सुरू झाले तेव्हा त्यामध्ये आफ्रिकेतील ५४ देशांचा समावेश नव्हता. नंतर दबाव टाकला गेला. दक्षिण अमेरिका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आदी देश युद्धात नाहीत. त्यामुळे याला जागतिक महायुद्ध म्हणता येत नाही. हे युद्ध किती लांबेल हे स्पष्टपणे कुणी सांगू शकत नाही. रशिया एवढा मजबूत आहे तो पराभूत होऊ शकत नाही आणि अमेरिका व नाटो यांचा पाठिंबा असलेला युक्रेन इतका कमकुवत आहे की, तो जिंकू शकत नाही. दोन्ही बाजूने तयारीने युद्धात उतरल्या आहेत.

अमेरिका व पाश्चात्य देश चर्चा किंवा तहाद्वारे मागे हटले तर नंतर चीनदेखील दादागिरी करू लागेल. हे अमेरिका जाणून आहे. युक्रेन नाटोमध्ये येणार नाही हे त्यांनी सांगितले तर युद्ध लागलीच संपेल; पण हे होणार नाही. रशिया व अमेरिकेतील युद्धाची ‘युद्धभूमी’ युक्रेन आहे. युक्रेन केवळ एक प्यादा आहे. रशियाला आर्थिकदृष्ट्या संपविणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे.

म्हणून युद्ध लांबणार...

अमेरिका व पाश्चात्य देशांचा अंदाज होता की, निर्बंधाद्वारे रशियाचे आर्थिक कंबरडे मोडता येईल; पण रशिया २०१४ पासून तयारी करत आहे. निर्बंधांचा त्यांच्यावर परिणाम झाला; पण हा देश आर्थिकदृष्ट्या कोलमडला नाही. अमेरिका व पाश्चात्य देशांची लवकर विजय मिळविण्याची रणनीती चुकली आहे. रशियाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर ते अण्वस्त्रे वापरू शकतात.

एमआयसीला युद्ध होण्यात रस

अमेरिकेचा प्रमुख शत्रू चीन आहे; पण राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे लक्ष चुकीच्या दिशेने वळविण्यात आले. अमेरिकेत मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स (एमआयसी) आहे. त्यांना जगात युद्ध होण्यात स्वारस्य असते. त्यांची शस्त्रास्त्रे विकली जातात, नफा होतो. रशिया चीनची मदत घेत आहे. त्यांच्यातही काही मुद्यांवर मतभेद आहेत; पण या दोघांचाही मोठा शत्रू अमेरिका आहे. त्याच्या विरुद्ध हे देश एकत्र आले. भारत आपली शक्ती, प्रभाव वाढवत आहे. कोणा एकाच्या बाजूने झुकण्यापेक्षा स्वत:चे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे. जगात भारताच्या मताला महत्त्व प्राप्त होत आहे.

पाकिस्तानचे काय?

पाकिस्तानात सामाजिक, राजकीय, आर्थिकदृष्ट्या नाजूक परिस्थिती आहे. पाकिस्तानचे तुकडे झाले तर त्यांच्याकडे १५० अण्वस्त्रे आहेत, ती शस्त्रे अयोग्य हातात पडावीत हे जगाला मंजूर नाही. म्हणून परिस्थिती असली तरी पाकिस्तान तुटणार नाही. चीन आपल्या कॉलनी बनविण्यासाठी पाकिस्तानला तुटू देणार नाही. कर्जे देऊन आधीच दबावात घेतले आहे. अमेरिकेला अण्वस्त्रांची भीती आहे. अमेरिका चीनविरोधासाठी पाकिस्तानवर नियंत्रण ठेवत आहे; पण पाकिस्तानात सरकारविरोधात बलूच नाराज आहेत. यामध्ये भारताला विशेष काही करण्याची गरज नाही. पाकिस्तान आपल्या विनाशाकडे स्वत:हून पुढे सरकत आहे. पाकिस्तानी जनता त्यांच्या सरकारमुळे त्रासलेली आहे. त्यांनी त्यांचे निर्णय घ्यावेत. भारताने त्यामध्ये हस्तक्षेप करू नयेत.

Web Title: Retired Brigadier Agarwal says on Russia-Ukraine war, this is not a world war!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.