निवृत्त फौजदाराने केली गावची निवडणुक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:48 AM2021-01-08T04:48:31+5:302021-01-08T04:48:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : गेल्या ५० वर्षात गटतटाच्या राजकाराणाशिवाय पार न पडलेली अशा डिकसाई गावात यंदा प्रथमच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : गेल्या ५० वर्षात गटतटाच्या राजकाराणाशिवाय पार न पडलेली अशा डिकसाई गावात यंदा प्रथमच ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध पार पडली. त्यासाठी निवृत्त फौजदार अरुण संतोष चव्हाण यांनी परिश्रम घेतले आणि सर्वांना एकत्र घेत ग्रामपंचायतच बिनविरोध केली.
डिकसाई ग्रामपंचायतीची स्थापना १९५३ ला झाली. ६७० मतदार आणि सात ग्रामपंचायत सदस्यांची संख्या असलेल्या डिकसाईत प्रत्येक निवडणुक अटीतटीच्या असायच्या. त्यामुळे अनेकवेळा तंटेबखेडे उभे राहत यामुळे डिकसाई विकासाच्या बाबतीत कायमच मागे पडला होता.
डिकसाईचे मूळ रहिवाशी व ठाण्यातील निवृत्त फौजदार अरूण संतोष चव्हाण यांचा मोठा वाटा गावाच्या बिनविरोध निवडणुकीमागे आहे. त्यांनी ग्रामस्थांसमोर यंदाच्या निवडणुकीला फाटा देण्याचा विचार बोलून दाखविला. ग्रामस्थांच्या बैठकीत माजी सरपंच गोरख चव्हाण तसेच तुळशीराम सुर्यवंशी, गुलाब पाटील, सुकदेव कोळी, अनिल चव्हाण आदींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सुरूवातीला सातपैकी चार जागा बिनविरोध निघाल्या. परंतु, तीन जागांसाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागली. अर्ज माघारीच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत त्याकरीता सर्वांनी प्रयत्न केले. एकदाच्या सातही जागा बिनविरोध निघाल्यामुळे डिकसाई ग्रामपंचायतीत नवा इतिहास रचला गेला.