सेवानिवृत्त फौजदार घरात असताना लांबविली ४८ हजाराची रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 02:07 PM2019-08-12T14:07:36+5:302019-08-12T14:08:20+5:30
मुक्ताईनगरातील घटना : ७० हजार सुरक्षित; मोलकरणीवर संशय
जळगाव : सेवानिवृत्त फौजदार गॅलरीत मोबाईलवर बोलण्यात गुंग तर पत्नी बाथरुममध्ये असताना घरकामासाठी असलेल्या महिलेने तिजोरीचे कुलुप उघडून ४८ हजाराची रोकडसह चावी लांबविल्याचा प्रकार मुक्ताईनगरात उघडकीस आला. विशेष म्हणजे ही रक्कम चोरुन नेताना तिजोरीत ठेवलेले ७० हजार रुपये जसेच्या तसे आहेत. याप्रकरणी रविवारी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगरातील गट क्र.३२ मध्ये सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भगवान विश्राम पाटील (५८) हे पत्नी सीमा पाटील यांच्यासह वास्तव्याला आहेत. मोठा मुलगा कपील पाटील पुणे येथे डॉक्टर तर लहान मुलगा स्वप्नील हा ठाणे येथे महानगरपालिकेत नोकरीला आहे. मुलगी वैशाली हिचे लग्न झालेले आहे, ती पतीसह ठाणे येथे वास्तव्याला आहे. त्यामुळे घरी भगवान पाटील व सीमा पाटील असे दोघंच असतात. घरकामासाठी त्यांनी कल्पना मिस्तरी ही महिला लावलेली आहे. शुक्रवारी सकाळी भगवान पाटील गॅलरीत मोबाईल बोलत होते तर पत्नी बाथरुममध्ये होत्या. कल्पना ही घरात काम करीत होती. यावेळी कल्पना हिने शोकेसमध्ये ठेवलेली तिजोरीची चाबी घेऊन त्यातील दोन हजार रुपयांच्या २४ नोटा असे ४८ हजार रुपये काढून घेतले तर शंभर रुपये दराचे ७० हजाराचे सात बंडल जसेच्या तसे राहू दिले. सोबत जाताना तिजोरीचीही चावी घेऊन गेली.
संध्याकाळी फुटली बोंब
संध्याकाळी भगवान पाटील यांना पैशाची गरज भासली असता तेथे चाव्या नव्हत्या. त्यामुळे इतर साहित्याचा वापर करुन तिजोरी उघडली असता चोरीचा प्रकार लक्षात आला. दरम्यान, तिघांशिवाय घरात दुसरा कोणीच व्यक्ती नव्हती किंवा बोहरुनही आलेली नाही.त्यामुळे ही चोरी कल्पना मिस्तरी हिनेच केल्याचा संशय पाटील यांनी व्यक्त केला असून तिच्याच नावाने पोलिसात तक्रार दिली आहे.