अभ्यासिका व जलसंधारणाच्या कामासाठी निवृत्त मुख्याध्यापकाचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 10:52 AM2018-05-05T10:52:11+5:302018-05-05T10:52:11+5:30
नांद्रा : गावाच्या विकासासाठी दिली सुमारे दीड लाखांची रक्कम
- शामकांत सराफ
पाचोरा : शिक्षणामुळे कुटुंब आणि समाजाची प्रगती होते आणि जलसंधारणामुळे शेतीचा विकास करता येतो या उदात्त हेतूला हातभार म्हणून पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक डब्ल्यू.एस.पाटील यांनी पुढाकार घेतला. या कामाला चालना मिळावी यासाठी स्वत: दीड लाखांची रक्कम दिली आहे. पाचोरा तालुक्यातील नांद्रा या छोट्याशा गावात सेवानिवृत्ती नंतरही डब्ल्यू.एस.पाटील हे अध्यापनाचे काम करीत आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी अभ्यासिका तयार करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांच्या या विचारांना माजी विद्यार्थ्यांनी साथ देत ५५ हजार रुपयांचा निधी जमविला. या रकमेत पाटील यांनी २१ हजारांची रक्कम टाकून अभ्यासिका तयार केली. या अभ्यासिकेत एक संगणक, परीक्षेची पुस्तके, अवांतर पुस्तके ठेवण्यात आली आहेत.
१ लाखांच्या निधीची उभारणी
या अभ्यासिकेचे उद्घाटन २ मे रोजी दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांच्या हस्ते झाले. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ही अभ्यासिका यशस्वीपणे सुरु राहण्यासाठी व देखभालीसाठी एक लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यांनी उपस्थित लोकांना आवाहन केले आणि तात्काळ पाटील यांनी पुन्हा एकवीस हजार दिले. माजी पोलीस, पाटील रघुनाथ सखाराम पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी ४१ हजार रुपये दिल्याने एक लाखांची रक्कम सहज जमा झाली.
जलसंधारणाच्या कामासाठी एक लाखांचा निधी
सेवानिवृत्त मुख्याध्यापक डब्ल्यू.एस.पाटील यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात त्यांनी जलसंधारणाच्या कामासाठी गावास एक लाख रुपये देण्याचे ठरविले होते. त्यानुसार औरंगाबाद येथील महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान या सेवा भावी संस्थेमार्फत गावातील नदी खोली करणासाठी एक लाख रुपये लोकवर्गणी लागणार होती. या कामासाठी त्यांनी एक लाख रुपयांचा धनादेश ग्रामस्थांना दिला.