पूरग्रस्तांसाठी धावल्या सेवाभावी संस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:50 AM2019-09-21T00:50:34+5:302019-09-21T00:51:29+5:30
अमळनेर तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावल्या सेवाभावी संस्था धावल्या
संजय पाटील
अमळनेर, जि.जळगाव : कोल्हापूर आणि सांगली पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यामधील मुडी या परिसरामध्ये पूर आला होता. यात मुडी गावातील तसेच परिसरातील गावांतील काही गरीब परिवारांना या पुराची झळ पोहोचली. या पुरामध्ये पांझरा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या गरिबांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे चित्र समोर आले. या पार्श्वभूमीवर या परिवारांना मदतीचा हात म्हणून माणुसकी सेवा फाउंडेशन, वसंत लीला वुमेन्स वेलफेअर अॅण्ड कल्चरल असोसिएशन, द युनिक इव्हेंट, प्रमिलाबेन मणीलाल गाला ट्रस्ट आणि अनुपम स्टेशनरी या सेवाभावी संस्थांच्या वतीने खाद्यपदार्थ, कपडे आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
मुडी या गावातील परिवारासह बोदर्डे आणि चोंदे या परिसरातील गावातील पूरग्रस्त परिवारातील महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या, तर पुरुषांना आणि लहान मुलांना कपडे देण्यात आले. त्याचबरोबर या परिवारांना खाद्यपदार्थांची पाकिटेसुद्धा देण्यात आली. तसेच शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यात प्रत्येक परिवाराला या सेवाभावी संस्थांच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला.
पुरामध्ये सर्वस्व वाहून गेलेल्या संसार उघड्यावर पडलेल्या या आदिवासी कुटुंबीयांना या मदतीतून हातभार मिळाला आहे. यासाठी प्रमिला बेन मणीलाल ट्रस्टचे संचालक मणिभाई गाला, अनुपम स्टेशनरीचे संचालक रमणीक भाई गाला, त्याचप्रमाणे युनिक इव्हेंटचे संचालक अमेय नेवे, वसंत लीला वुमेन्स वेल्फेअर अॅण्ड कल्चरल असोसिएशनच्या मनीषा कोल्हे असोदेकर, माणुसकी सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभदा नेवे, बिजली ट्रेडर्सचे श्रीकांत मुंदडा, अमळनेर येथील महेंद्र पाटील, गुणवंत पाटील, संजय पाटील, शारंगधर देशमुख महाराज, वसंतराव पाटील, मंदाकिनी यांचे सहकार्य लाभले.