निवृत्त नव्हे, यंग सिनियर व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 03:08 PM2019-04-12T15:08:05+5:302019-04-12T15:08:22+5:30
‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार विजय पाठक.
माझे एक नातेवाईक सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीबद्दल मित्र परिवाराला त्यांनी एका हॉटेलमध्ये जंगी पार्टी दिली. आयुष्यभर प्रामाणिक सेवा आणि अत्यंत कार्यक्षम अधिकारी म्हणून नावलौकिक कमावल्याने निवृत्तीच्यावेळी त्यांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी ते कसे कार्यतत्पर होते, त्यांची कार्यक्षमता कशी वाखाणण्यासारखी होती हे सांगत त्यांची इच्छा असल्यास सहकार्यासाठी परत येण्याची आॅफरदेखील दिली. यांनी मात्र घरी आल्यानंतर सुटलो. एकदाचा नोकरीतून म्हणत नोकरीत असताना काय त्रास भोगला त्याचा पाढा वाचला. मी शांतपणे हे सारे ऐकत होतो. आता पुढे काय विचारता आतापर्यंत खूप काही केले. आता सकाळ संध्याकाळ फिरायला जायचे आणि आराम करायचा अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली.
त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया, ही सेवानिवृत्त झालेल्या प्रत्येकाची सामान्यपणे तत्काळ येणारी ही प्रतिक्रिया असते. नोकरी करीत असताना आपण किती क्षमतेने काम करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला इतरांकडून झालेला त्रास कसा सहन केला हे निवृत्तीनंतर प्रत्येक जण सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि पाठोपाठ आता आपण ज्येष्ठ नागरिक झालो सांगत. सकाळ संध्याकाळ फिरायला जायचे आणि आरामाचे जीवन जगायचे हे साचेबंद वाक्य ऐकायला मिळते. डोळसपणे पाहिले तर बागेत, काव्यरत्नावली चौकात वा अन्य सोयीस्कर जागी निवृत्तांचे ठरावीक वेळी गट एकत्र आलेले दिसतात. सुख-दु:खांची, विचारांची येथे आत्मीयतेने देवाण-घेवाण होते. या कट्ट्यावरील मित्रांचे वाढदिवस साजरे होतात. मात्र हे सर्व आपापल्या चौकटीत असतात, असे सर्व सामान्यपणे दिसून येते.
या उलट आता सेवानिवृत्तीनंतर मला काही वेगळे, आपल्या आवडीचे करायचे आहे, या विचारधारेतून आपल्याला खटकणारी बाब काहीजण दूर करू पाहतात तर काही समाजसेवेला झोकून देत विरंगुळा शोधू पाहतात. गणपत पोळ सरांनी सेवानिवृत्तीनंतर खो-खोला वाहून घेतले आणि नवे खेळाडू निर्माण करण्याचा ध्यास घेत वयाच्या ७५ व्या वर्षानंतरही मैदानावर असलेले आपण पाहतो. पु.ग.अभ्यंकरांची तीच गोष्ट. खेळ आणि संगीत याला सेवानिवृत्ती नंतर वाहून घेतले. आज जळगावकर त्यांच्याकडे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून पाहतात. कॉलेजमध्ये निवृत्त झाल्यानंतर सकाळी फिरायला गेलेल्या प्रा.सुजाता देशपांडे यांना मेहरुण तलावाकाठची घाण पाहून ती स्वच्छ केली पाहिजे. जाणिवेने स्वत: काम सुरू केले आणि दररोज फिरत असताना कागद कपटे प्लॅस्टिक गोळा करताना पाहून तेथे फिरायला येणाऱ्यांचे हळूहळू आपणहून अनेक हात मदतीला सरसावले. त्यातून एक चळवळ उभी राहिली. रारावीकर सरांनी निवृत्तीनंतर शिक्षणालाच वाहून घेतले. त्यातून विवेकानंदसारखी शाळा उभी राहिली. शरद छापेकरांनी शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले. शहरात पुरोहितांची चणचण पाहता पौराहित्य शिकून नवी फळी उभी राहिली पाहिजे. या जाणिवेतून चंद्रकांत वैद्यांनी शारदा पाठशाळा उभी केली तर विद्याधर पानट यांनी महाराणा प्रतापांच्या जीवनावर सखोल अभ्यास करून शेकडो व्याख्याने दिली. अशी अनेक उदाहरणे माझ्यासमोर आली.
अनेकांशी बोलताना निवृत्तीनंतर हे विना मोबदला करीत असलेले काम आनंददायी असल्याचे मत व्यक्त करीत यातून विरंगुळा मिळतो, आपल्या हातून समाजसेवा घडत असल्याचे मत व्यक्त केले. आम्ही केवळ वयामुळे निवृत्त झालो. त्यामुळे आमची निवृत्ती नव्हे तर ही आमची सेकंड इनिंग आहे. आम्ही यंग सिनियर असल्याचे प्रा.शरद छापेकर, प्रा.चारुदत्त गोखले म्हणतात. यांचा यंग सिनियर हा शब्द मला खूप आवडतो. निवृत्त म्हणत जगण्यापेक्षा यंग सिनियर शब्द हा उभारी देणारा, उत्साहपूर्ण वाटला. माझ्या या निवृत्त झालेल्या नातेवाईकाला मी निवृत्त जीवन जगण्यापेक्षा आता यंग सिनिअर होण्यास सांगितले. आपल्याला परत कुणी यंग म्हटले या कल्पनेने त्यांचा चेहरा खुलला. काही वेगळे करण्यासाठी...
-विजय पाठक, जळगाव