‘स्थायी’तील निवृत्त होणाऱ्या सदस्यांमुळे लागणार भाजप व बंडखोरांचा कस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:16 AM2021-07-30T04:16:59+5:302021-07-30T04:16:59+5:30
भाजपच्या जागा वाढतील, बहुमत मिळणे मात्र कठीण; कोणते गटनेते करणार सदस्यांची नियुक्ती? लोकमत न्यूज नेटवर्क अजय पाटील जळगाव : ...
भाजपच्या जागा वाढतील, बहुमत मिळणे मात्र कठीण; कोणते गटनेते करणार सदस्यांची नियुक्ती?
लोकमत न्यूज नेटवर्क
अजय पाटील
जळगाव : मनपा स्थायी समितीमधील ८ सदस्य पुढील दोन महिन्यांत निवृत्त होणार असून, नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. मात्र, निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागेवर नव्याने नियुक्ती करण्यात येणाऱ्या सदस्यांच्या नावावरून भाजप व भाजप बंडखोर नगरसेवक पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. कारण, नवीन सदस्यांची नियुक्ती हे त्या पक्षाचे गटनेते करत असतात, मात्र भाजपचे सध्या गटनेते कोण? हे जाहीर नाही. त्यामुळे आता स्थायीतील भाजप सदस्यांची नावे कोणता गटनेता जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनपा स्थायी समितीत आठ सदस्य हे दोन वर्षांनंतर निवृत्त होत असतात. त्यानुसार येत्या ऑक्टोबर महिन्यात भाजपचे स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्यासह बंडखोर व शिवसेनेचे मिळून ८ सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यासाठीची निवड प्रक्रिया करून, स्थायी समिती सभापतींची निवड करण्यात येणार आहे. भाजपकडे सध्या मनपा स्थायी समिती सभापतीपदाशिवाय कोणतेही पद नाही. त्यामुळे हे पद कायम ठेवण्यासाठी स्थायी समितीत बहुमत प्राप्त करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बंडखोरांमुळे भाजपचे गणित एका सदस्यामुळे बिघडताना दिसून येत आहे.
५ सदस्यांची नियुक्ती करूनही भाजपला बहुमत मिळणे कठीण
स्थायीमध्ये एकूण १६ जागा असून, आठ सदस्य निवृत्त होणार आहेत. यामध्ये बंडखोर नगरसेवकांचे नवनाथ दारकुंडे, रेश्मा काळे, प्रतिभा देशमुख यांचा समावेश आहे. तर भाजपचे राजेंद्र घुगे पाटील, मुकुंदा सोनवणे, शिवसेनेचे नितीन लढ्ढा व नितीन बरडे तर एमआयएमचे शेख सईदा युसूफ निवृत्त होणार आहे. नव्याने नियुक्ती करण्याचे अधिकार पक्षाच्या गटनेत्यांना राहणार आहे. भाजपने नवीन ५ सदस्यांची नियुक्ती केली तर भाजपकडे ७ सदस्य होणार आहेत. तर बंडखोर व शिवसेनेचे मिळून ८ व एमआयएम मिळून १ असे ९ सदस्य राहणार आहेत. त्यामुळे ५ सदस्यांची नियुक्ती झाली तरी भाजपला बहुमत मिळणे कठीण आहे
कोणते गटनेते अधिकृत?
१. भाजप बंडखोरांनी नगरसेवकांची संख्या जास्त असल्याचे कारण सांगून भाजप गटनेतेपद ॲड. दिलीप पोकळे यांना जाहीर करून, भगत बालाणी यांचे पद काढले असल्याचा दावा केला होता.
२. तर भाजपने ॲड. दिलीप पोकळे यांचे गटनेतेपद अनधिकृत असल्याचे सांगत न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. त्यामुळे भाजपचे अधिकृत गटनेते कोण? हा वादाचा मुद्दा सुरू आहे.
३. स्थायीमधील सदस्यांच्या नियुक्तीवरून हा वाद देखील निर्माण होण्याची शक्यता असून, भाजप व बंडखोर आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
बंडखोरही न्यायालयात जाण्याच्या तयारीत
एकीकडे बंडखोरांच्या गटनेते नियुक्तीवरून भाजपने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर, दुसरीकडे आता स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या आधी बंडखोर नगरसेवक देखील न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे स्थायीचे राजकारण देखील पेटण्याची शक्यता आहे.