शेतीच्या उत्पन्नाचा ताळेबंद देत मिळविला वजा उत्पन्नाचा दाखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 05:09 PM2017-10-04T17:09:34+5:302017-10-04T17:23:34+5:30
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील शेतकºयाने आपल्या शेतातील उत्पन्नाला मिळणारा हमीभाव आणि त्याला आलेला खर्च याचा हिशोब सादर करीत तहसीलदारांकडून वजा उत्पन्नाचा दाखला मिळविला आहे. या माध्यमातून शेती परवडत नसल्याचे सिद्ध होऊ पाहत आहे.
संजय पाटील /आॅनलाईन लोकमत
अमळनेर,दि.४ - तालुक्यातील मंगरूळ येथील शेतकरी हिरालाल पाटील यांनी आपल्या शेतात उत्पादित केलेल्या शेतमालाला शासनाकडून मिळणारा हमीभाव आणि त्यासाठी आलेला खर्च तहसीलदारांकडे सादर करीत वजा उत्पन्नाचा दाखला मिळविला आहे.
मंगरूळ येथील शेतकरी हिरालाल केशव पाटील यांनी शेत मालाला शासनाचा हमी भाव आणि त्यानुसार विकलेला माल आणि त्यांनी शेतीवर केलेल्या बियाणे , खत , मजुरी आदी खचार्चा हिशोब पावत्यांसह केला असता त्यांना मिळालेल्या शेतमाला पासूनचे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्याने वजा उत्पनाचा दाखला मिळावा म्हणून तहसीलदारांकडे अर्ज केला होता. मात्र वजा उत्पनाचा दाखला देण्याची तरतूद नाही व आॅनलाईन सॉफ्टवेअर मध्ये ही तशी व्यवस्था नसल्याने असा दाखला देता येणार नाही म्हणून तहसीलदारांनी नकार देण्यात आला होता. मात्र शेतकरी मागणीवर ठाम होते त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन १ लाख ९६ हजार ६६७ रुपयांचा वजा उत्पन्नाचा दाखला मिळावा म्हणून पाठपुरावा केला. अखेर तहसीलदारांनी प्रतिज्ञापत्र व पावत्या ग्राह्य धरून आॅनलाईन दाखला देता येत नसल्याने स्वतंत्र पत्र देऊन वजा उत्पन्नाचा दाखला दिला आहे. यावरून शासनाच्या ठरवलेल्या हमीभावावरून शेती परवडत नसल्याचे शासकीय कागदोपत्री सिद्ध झाले आहे
वजा उत्पन्नाच्या आधारावर हिरालाल पाटील शासनाकडे विविध लाभाची मागणी करणार आहेत. मात्र उत्पन्न दाखल्यावर कोणताही लाभ देता येणार नाही असे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.