पत्ता पूर्ण टाकूनही, टपाल परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:43 PM2019-11-18T22:43:14+5:302019-11-18T22:43:27+5:30
जळगाव : दिवाळीत मित्र परिवार व नातलगांना पोस्टाने पाठविलेले शुभेच्छा पत्र संपूर्ण पत्ता टाकूनही शुभेच्छांचे पाकिट परत आल्याचा प्रकार ...
जळगाव : दिवाळीत मित्र परिवार व नातलगांना पोस्टाने पाठविलेले शुभेच्छा पत्र संपूर्ण पत्ता टाकूनही शुभेच्छांचे पाकिट परत आल्याचा प्रकार जळगावात घडला. याबाबत संबंधित ग्राहकाने पोस्टाच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत डाक अधिक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे.
जतीन ओझा यांनी ही तक्रार केली आहे. दिवाळीनिमित्त त्यांनी आपल्या जळगावातीलच मित्र परिवाराला पोस्टाने शुभेच्छा पत्र पाठविले होते. या पत्रांवर पाठविणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण नाव व पूर्ण पत्ता टाकला होता.
मात्र, पोस्टमनने पाकीटावर पत्ता अपूर्ण आहे, म्हणून हे पत्र संबंधित व्यक्तीपर्यंत न पोहचवता पोस्टातच आणून ठेवले. त्यानंतर पोस्टाने हे पत्र मूळ मालक म्हणून ओझा यांच्याकडे परत पाठविले.
नाव आणि संपूर्ण पत्ता टाकूनही पोस्टमनने हे पत्र आपल्या मित्र परिवारापर्यंत न पोहचविता परत आणल्यामुळे जतीन ओझा यांनी पोस्टाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच टपाल विभागात व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे, नागरिक कुरिअरच्या सेवेचा पर्याय निवडत असल्याचे सांगत, पोस्टाच्या कामकाजावरप्रश्न उपस्थित केला आहे.
तसेच जतीन ओझा यांनी संपूर्ण पत्ता टाकूनही, पुणे येथील नातलगांना पाठविलेले पत्रही घरी परत आल्याने तेथील टपाल विभागाकडे ओझा यांनी तक्रार केली आहे.
आमच्यापर्यंत अजून संबंधित ग्राहकाची तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर, त्यांची चौकशी करुन, पुढील कारवाई करण्यात येईल.
-राजेश रनाळकर, डाक अधिक्षक जळगाव.