निवडणूक काळात जप्त केलेली २३ लाखांची रोकड संबंधितांना परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 09:40 AM2019-04-26T09:40:36+5:302019-04-26T09:40:41+5:30
निवडणूक काळात भरारी पथकांनी संशयावरून सुमारे २३ लाखांची रोकड व ५ किलो चांदी पकडली होती.
जळगाव : निवडणूक काळात भरारी पथकांनी संशयावरून सुमारे २३ लाखांची रोकड व ५ किलो चांदी पकडली होती. ही रक्कम मतदारांना वाटपासाठी नसल्याची खात्री झाल्यानंतर संबंधितांना ती परत करण्यात आली. निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी पैशांचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये भरारी पथक नेमण्यात आलेले होते.
या पथकाकडून वाहनांची तपासणीही केली जात होती. त्यात रावेर लोकसभा मतदारसंघात १३ लाख १४ हजार ८०० रूपये तर जळगाव मतदार संघात ९ लाख ८० हजारांची रोकड व ५ किलो चांदी जप्त करण्यात आली होती.जिल्हास्तरीय कॅश रिलीज समितीने संबंधितांकडून या रक्कमेच्या वापराबाबतचे पुरावे तपासून ही रक्कम मतदारांना वाटपासाठी नसल्याची खात्री करून परत केली आहे.