लाचखोरीत ‘महसूल’ आणि पोलीसच अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:18 AM2021-02-25T04:18:48+5:302021-02-25T04:18:48+5:30

जळगाव : लाचखोरीत सलग प्रथम राहण्याची परंपरा महसूल विभाग कायम राबत असून त्याखालोखाल पोलीस खात्याने देखील आपले दुसरे स्थान ...

‘Revenue’ and police are the leaders in bribery | लाचखोरीत ‘महसूल’ आणि पोलीसच अग्रेसर

लाचखोरीत ‘महसूल’ आणि पोलीसच अग्रेसर

Next

जळगाव : लाचखोरीत सलग प्रथम राहण्याची परंपरा महसूल विभाग कायम राबत असून त्याखालोखाल पोलीस खात्याने देखील आपले दुसरे स्थान कायम ठेवले आहे. २०१९ ते आजपर्यंत २६ महिन्यात ५५ लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यात प्रांताधिकारी, तहसीलदार आदी महसूलच्या वर्ग १च्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लाचखोरांची संख्या कमी आहे. २०१९ मध्ये ३१ लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले होते. यंदा कोरोनामुळे सहा महिने लॉकडाऊन लागू असल्याने सरकारी कार्यालयातील कामेही थांबली होती, त्यामुळे लाचखोरीत घट झाली आहे. २०२० मध्ये २० लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. यंदा प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, सहायक पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष लेखाधिकारी आदी बड्या माश्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील विविध विभागाच्या सहा बडे अधिकारी एसीबीच्या रडारवर आहेत. या अधिकाऱ्यांनी अवैध मार्गाने मोठी मालमत्ता जमविल्याच्या तक्रारी असून त्याची गोपनीय चौकशी सुरू झालेली आहे. सर्व पुरावे हाती आल्यावर अपसंपदेचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होऊन मालमत्ता जप्तीचीही कारवाई होऊ शकते, त्यामुळे या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. २०१९ मध्ये दोन अधिकाऱ्यांवर अपसंपदेचे गुन्हे दाखल झाले होते, यंदा हा आकडा सहावर गेलेला आहे. सध्या हे प्रकरण चौकशीवर आहे.

कोट....

भ्रष्टाचार कमी करण्यासाठी नागरिकांनीच जागृत राहून लाचेची तक्रार द्यावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाते. मावळ्यात वर्षात सर्वात जास्त महसूल विभागाच्याच भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या. महसुल व पोलीस हे दोन विभाग सतत भ्रष्टाचाराच्याबाबतीत आघाडीवर असल्याचे कारवाईवरुन लक्षात येते.

-गोपाळ ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वयोगटानुसार पकडलेले बाबू

वर्ष २१ ते ३० ३१ ते ४० ४० ते ५० ५१ ते ६०

२०१९ ०० १४ ११ ५

२०२० ०१ ११ ४ ४

२०२१ ०१ ०१ १ १

तारुण्यातच पैशांचा मोह

१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या तीन वर्षात केलेल्या कारवाईवरून सर्वाधिक ३१ ते ४० वयोगटातील अधिकारी व कर्मचारीच पैशांच्या मोहाला बळी ठरल्याचे दिसून येत आहे. त्यात वर्ग १ व २ च्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. लाचखोरीत महिलादेखील मागे नसल्याचे दिसून येत आहे. महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या वर्ग १ च्या अधिकारी महिला जाळ्यात अडकल्या आहेत. तारुण्यातच पैशांचा मोह या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुटला आहे.

२) सरकारी काम करीत असताना भरमसाठ पैसा मिळत असल्याने या वरच्या पैशात स्वत: तसेच कुटुंबातील सदस्यांच्या गरजाही अधिक वाढल्या आहेत. कष्ट न करता सहज पैसा मिळत असल्याने अफाट खर्च करायला विशेष वाटत नाही. पगाराला हात न लागता वरच्यावरच सर्व खर्च भागतो. त्यामुळे वाममार्गाने पैसा मिळविण्यासाठी अधिकारी, कर्मचारी सामान्य व गोरगरिबांची अडवणूक करतात. जेव्हा पापाचा घडा भरतो, तेव्हा लाचलुचपत असो किंवा अन्य माध्यमातून तो फुटतोच. चुकीच्या मार्गाने येणाऱ्या पैशांची तर काहींना नशाच झालेली असते, हा पैसा नाही आला तर ही व्यक्ती बेचैन होते, सारखी चिडचिड करते.

३) वयाच्या तिसीच्या आत दोन जण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. तर ४० ते ५० या वयोगटातील १६ लाचखोर दोन वर्षात अडकले आहेत. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले १० जणांनी नोकरीचा विचार न करता लाचेचा मोहाड अडकले अन‌् संपूर्ण सेवेवरच पाणी फिरले. समाजात वाढत चाललेली ही प्रवृत्ती अत्यंत घातक ठरत चालली आहे. लाचलुचपत विभागाकडून कारवाया होतात, नागरिकांना आवाहन केले जाते, तरी देखील लाचेचे प्रमाण कमी होत नाही.

Web Title: ‘Revenue’ and police are the leaders in bribery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.