महसूलमंत्री साहेब, वाळू चोरी रोखण्यासाठी बाऊन्सर कधी नियुक्त करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 10:04 PM2018-11-10T22:04:30+5:302018-11-10T22:06:09+5:30
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्षभरापूर्वी जळगावात दिले होते आश्वासन
विकास पाटील
राज्यभरात वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने बाऊन्सरची (खाजगी सुरक्षा रक्षक) नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री तथा जळगाव जिल्ह्णाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्षभरापूर्वी जळगावात दिले होते. पालकमंत्र्यांनीदिलेल्या आश्वासनांपैकी हे एक आश्वासन. ते कदाचित विसरले असतील मात्र जळगावकर अजिबात विसरलेले नाही. जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित कार्यक्रमासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘राज्यातील नदी पात्रांमधील वाळू शासनासाठी डोकेदुखी ठरली आहे. चोरी रोखण्यासाठी नदीपात्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. वाळू चोरट्यांचा, माफियांशी मुकाबला करण्यासाठी बाऊन्सरची नियुक्ती करण्यात येईल....अशी अनेक आश्वासने महसूलमंत्र्यांनी त्या कार्यक्रमात दिली होती. दुदैव असे की, जळगाव जिल्ह्णात ना बाऊन्सरची नियुक्ती झाली ना नद्यांमध्ये कॅमेरे बसविण्यात आले. महसूलमंत्र्यांची आश्वासने हवेत विरली.
वाळू ठेक्यांची मुदत ३० सप्टेंबर रोजीच संपली. त्यानंतर नदी पात्रातून वाळू वाहतूक बंद होणे आवश्यक होते, मात्र जणू महसूल प्रशासनाने परवानगी दिली आहे, अशा पद्धतीने गिरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा सुरु आहे. आव्हाणे, खेडी गावालगतच्या गिरणा नदी पात्रात तर रात्रीच्यावेळी वाळू चोरट्यांची जत्रा भरते.
गिरणा नदीच्या वाळू दर्जेदार असल्याने राज्यपरराज्यातून या वाळूला मोठी मागणी असते. त्यामुळे येथील वाळूचा प्रचंड उपसा होतो.असे असतानाही प्रशासन डोळे मिटून आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने आतापर्यंत अनेक निष्पापांचा बळी गेला आहे. अपघातानंतर संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड होते. धडक देणाºया डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल होतो, मालक मात्र मोकाटच असतो. या घटनेनंतर प्रशासन थोडे दिवस कारवाईचे नाटक करते. नागरिक शांत झाल्यानंतर प्रशासनही कारवाई थांबविते अन् पुन्हा वाळू वाहतूक सुरु होते.
गेल्या अनेक वर्षांपासूनहीच स्थिती आहे. आतापर्यंत अनेक निष्पापांचे बळी गेले मात्र प्रशासन वाळू चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. मोक्का, हद्दपारीचीही कारवाई करण्यात येईल, असेही आश्वासने आतापर्यंत देण्यात आली मात्र एक-दोन कारवाई वगळता कोणतीही ठोस कारवाई प्रशासनानेकेलेली नाही.
धक्कादायक म्हणजे शहर पोलीस स्टेशनसमोरुन मनपाच्या चौबे शाळेमार्गे वाळूची वाहने भरधाव वेगाने जात असतानाही कोणतीही कारवाई होत नाही. महसूल, पोलीस व आरटीओ प्रशासन एकत्र आले व त्यांनी वाळू चोरी विरुद्ध जोरदार मोहिम राबविली, असे चित्र जिल्हावासीयांना कधीच दिसले नाही. एकत्र येवून कारवाई करण्यास त्यांना काय अडचण आहे?
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची स्वच्छ प्रतिमा असलेले मंत्री म्हणून ओळख असून जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकरही कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. असे असतानाही वाळू चोरटे जळगाव जिल्ह्णात शिरजोर झाले आहेत. महसूल, आरटीओ व पोलीस प्रशासनाने ठरविले तर वाळू चोरी नक्की बंद होईल, मात्र इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.तसेच महसूलमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली तरी वाळू चोरी बंद होऊ शकते.