महसूल कर्मचारी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 10:49 PM2019-08-28T22:49:07+5:302019-08-28T22:49:11+5:30
लाक्षणिक संपाने नागरिकांचे हाल : जुन्या पोन्शन योजनेसह विविध मागण्या
जळगाव : नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे वाढवण्यात यावा, अव्वल कारकून श्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात, शिपाई संवगार्तून तलाठी भरती व्हावी, २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाभरात ठिकठिकाणी २८ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. त्यामुळे महसूल विभागांतर्गत कार्यालयांचे कामकाज ठप्प होते.
यावल : येथे तहसीलमध्ये एकही कर्मचारी कामकाज करीत नसल्याने नागरिकांचे हाल झाले. तहसीलमधील २० कर्मचाºयांनी निवेदन दिले. मंडळाधिकारी शेखर तडवी, एम.एफ.तडवी, आर.बी.माळी, सकावत तडवी, निशा चव्हाण, आर.बी.मिस्तरी, बी.ई.पाटील, दीपक बाविस्कर, युनूस खान सहभागी होते. निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार उपस्थित होते.
अमळनेर : येथील तहसील कार्यालयात कर्मचाºयांनी सामूहिक रजा टाकून एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. यावेळी कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक ठाकरे, सचिव संदीप पाटील, कार्याध्यक्ष दिनेश सोनवणे आदी सहभागी झाले होते.
रावेर : तहसील कार्यालयातील १७ महसूल कर्मचाºयांनी सामुदायिक रजा टाकून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या ९५ संगणकीय परिचालकांनी एकदिवसीय धरणे आंदोलन छेडले. यात अव्वल कारकून डी.व्ही.ओतारी, एस.एफ.तडवी, शैलेश तरसोदे, हर्षल पाटील, मंडळाधिकारी शरीफ तडवी, प्रदीप आडे, सचिन पाटील, संदीप जैस्वाल, शिवप्रसाद लोलपे, अमोल घाटे, प्रविण पाटील, इंद्रजित भारंबे, योगेश मोहीते, भालेराव आदी कर्मचारी सहभागी झाले होते.
मुक्ताईनगर : तहसील कर्मचाºयांनी बुधवारी एक दिवसाची सामूहिक रजा टाकुन धरणे आंदोलन केले. यात ६ अव्वल कारकून, १० लिपिक व ५ शिपाई असे २१ कर्मचारी रजेवर होते. तहसीलदार, नायब तहसीलदारांशिवाय कोणताही कर्मचारी कार्यालयात नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
भडगाव : येथील तहसील कार्यालयातील २३ कर्मचारी सामूहिक रजेवर गेल्याने दिवसभर कामकाज ठप्प होते. या कर्मचाºयांमध्ये १५ अव्वल कारकून, १२ लिपिक, सहा सेवक यांचा समावेश आहे, अशी माहिती नायब तहसीलदार रमेश देवकर यांनी दिली.
पाचोरा : येथे तहसील कार्यालयातील २७, तर प्रांताधिकारी कार्यालयातील १० असे एकूण ३८ महसूल कर्मचारी बुधवारी सामूहिक रजेवर होते.
धरणगाव : येथे १९ कर्मचारी सामूहिक रजेवर होते. त्यात सात कारकून, आठ अव्वल कारकून, तीन शिपाई व एका वाहनचालकाचा समावेश होता.
जामनेर : येथे कारकून व अव्वल कारकून मिळून २८ कर्मचारी तर चाळीसगाव येथे ३३ कर्मचारी रजेवर होते.