महसूल कर्मचा-यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मदत करणार - सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 01:15 PM2018-01-28T13:15:32+5:302018-01-28T13:15:40+5:30
महसूल चतुर्थ श्रेणी कर्मचारी मेळाव्यात मांडल्या विविध मागण्या
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 28 - महसूल विभाग हा गोरगरिबांची सेवा करणारा विभाग असून शासनातील अतिशय महत्त्वाच्या असणा:या महसूल कर्मचा-यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
अल्पबचत भवनमध्ये जळगाव जिल्हा महसूल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्यस्तरीय कार्यकारीणी मेळावा व आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री पाटील उपस्थित होते, त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, तहसीलदार अमोल निकम, राज्य कार्यकारीणीचे डी. एम. अडकमोल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
लोकसेवक असल्याची जाण आवश्यक - जिल्हाधिकारी
लोकशाही व्यवस्थेमध्ये काम करीत असताना आपण जनतेचे सेवक आहोत ही भावना आपण सर्वांनी मनामध्ये ठेवून काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले. प्रत्येकाच्या मागण्या वेगवेगळया असतात, त्या सोडविण्यासाठी सनदशीर मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थिताना केले. यावेळी आमदार सुरेश भोळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
संघटनेने केल्या विविध मागण्या
यावेळी संघटनेच्यावतीने सेवानिवृत्त कर्मचारी, वैद्यकीय कारणास्ताव अपात्र असणारे कर्मचारी व स्वेच्छा निवृत्ती घेणारे कर्मचारी यांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. अनुकंपा तत्वावरीलसेवा भरती विनाअट करावी. गट ड संवर्गातील इतर कर्मचा:यांवर कामाचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने 14 जानेवारी 2016 च्या शासन निर्णयातील अट क्र. 5 रद्द करणे, 2005पासूनची चतुर्थश्रेणी कर्मचारी अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुन्या पध्दतीने चालू करावी, कोतवालांना पेन्शन योजना लागू करावी, अशा मागण्यांचे निवेदन पदाधिका:यांनी राज्यमंत्री पाटील यांना दिले.
प्रास्ताविक अध्यक्ष डी. एम. अडकमोल यांनी केले.
या कार्यक्रमास राज्य कार्यकारीणीचे व जिल्हा कार्यकारीणीचे सर्व पदाधिकारी, तसेच महसूल विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.